अकोला : अतिक्रमणधारक शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली. पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढून धडक देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पक्षाच्या टॉवर चौकातील कार्यालयातून मोर्चाला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. यावेळी मार्गात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेत भूमिहीन तथा अतिक्रमणधारकांचा प्राधान्याने समाविष्ट करावा, लॉटरी पद्धत बंद करीत तालुक्यात उपलब्ध जमिनीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन जमिनींचे वाटप करावे, १४ एप्रिल १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयानुसार पात्र प्रकरणाला चुकीचा संदर्भ न देता ते प्रकरणे नियमानुकूल करण्यात यावे, २०११ पर्यंत शासकीय जमिनीत पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत, त्यांना नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक निर्णय जाहीर करावा, सौरऊर्जा प्रकल्प शासनाच्या उभे पीक असलेल्या जमिनीवर न घेता तो इतर ठिकाणी घेण्यात यावा, शहर व ग्रामीण अतिक्रमणीत घरकुल नियमानुकूल करून त्वरित व बांधकाम करण्यात यावे, शहरातील फेरीवाले व हातगाडी व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा देण्यात यावी, सन १९८२ ते १९८६ दरम्यान लोणी गट क्र. ५१, गट क्रमांक ३३, दधम येथील अतिक्रमणधारकांनी १४ दिवस ‘जेल भरो’ आंदोलन केले होते, त्या अतिक्रमणधारकांना प्राधान्याने त्वरित जमिनींचे वाटप करावे आदींसह विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले.

शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी वंचितचे जिल्हा प्रभारी ॲड.नातिकोद्दिन खतीब, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, आम्रपाली वाघमारे, धमा गवई, आम्रपाली खंडारे, संगिता अढाऊ, कलीम पठाण, मजहर खान, गजानन गवई, मनोहर बनसोड, अशोक दारोकार, किशोर जामनिक, चरण इंगळे, सुनील सरदार, डॉ. धर्माळ, पवन बुटे, अनुराधा डांगे, मंगला शिरसाट, वंदना वासनिक, वैशाली कांबळे, लक्ष्मी वानखडे, गजानन दांडगे, प्रदीप शिरसाट, संजय किर्तक, प्रदीप पळसपगार, सतीश चोपडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह वंचितचे कार्यकर्ते व अतिक्रमणधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.