नागपूर : अंबाझरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व स्मारकासाठी राखीव असलेली ४४ एकर जागा खासगी कंत्राटदारांच्या घशात घालून आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर स्मारकासाठी असलेली राखीव जागा जशीच्या तशी ठेवावी आणि खासगी कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी सर्व गटतट विसरून आंबेडकरी समाज निळ्या झेंड्याखाली एकवटला.
या विराट मोर्चाचा आवाज विधानभवनापर्यंत पोहचला. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे कारण सांगून मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली. त्यामुळे मोर्चा आक्रमक झाल्याने पोलीस यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. मोर्चा स्थळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भिख्खू संघाच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील आंबेडकरी समाज, संविधानप्रेमी जनता मॉरेस कॉलेज चौकात जमा झाले. जवळपास ५ ते ७ हजार लोकांचा मोर्चा धडकल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. मोर्चास्थळावर प्रा. जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, उपेंद्र शेंडे, कमलताई गवई, रणजीत मेश्राम, ई.झेड. खोब्रागडे, सरोज आगलावे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
हेही वाचा: नोकरीसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक; कायद्यात तरतूद करण्याची फडणवीस यांची घोषणा
अंबाझरीतील ४४ एकर जागा अंबाझरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व स्मारकासाठी राखीव असलेली ४४ एकर जागा खासगी कंत्राटदारांला राज्य शासनाने नाममात्र दरात कराराने दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गरुडा अम्युझमेंट पार्क कंपनीशी जमिनीसंबंधीचा करार रद्द करावा. तेथे २० एकर जमिनीवर डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक बांधावे. एक भव्य ग्रंथालय, एक ऑडिटोरियम, वाचन कक्ष आणि सभाकक्ष तयार करण्यात यावे. जुने स्मारक आणि सांस्कृतिक भवन पाडणाऱ्या गरुडा अम्युझमेंटच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावे आणि जागा पहिल्यासारखी राखीव करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरी जनतेने केली. मोर्चामध्ये संयोजक बाळू घरडे, किशोर गजभिये, डॉ. धनराज दहाट, सुधीर वासे, सिद्धार्थ उके, राहुल परुळकर आणि प्रताप गोस्वामी यांची उपस्थिती होती.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!; उद्धव ठाकरे यांची मागणी
विरोधकांची मोर्चाला भेट
मोर्चाला आमदार अमोल मिटकरी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. विकास ठाकरे यांनी भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपवण्याचे कट-कारस्थान भाजप रचत आहे. मात्र, बाबासाहेबांच्या विचाराच्या वादळात राज्याचे सरकार वाहून जाईल. आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या सरकारने जागा हडपून आंबेडकरी जनतेचा अपमान केल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.