नागपूर : अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळ तीव्र झाले असून हे चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत आहे. तर याचवेळी ओडिशातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र बिहारकडे जाण्याची शक्यता देखील आहे. ओडिशातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने आज, रविवारी विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रामुख्याने पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ रविवारी संध्याकाळपर्यंत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य अरबी समुद्रापर्यंत पोहोचल्यावर पूर्वेकडे वळण्यास सुरुवात करेल. मान्सून परत गेल्यानंतर निर्माण झालेल्या या तीव्र चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर, विशेषतः मुंबई परिसरात, आधी उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, वाऱ्यांचा बदलता वेग आणि मार्गातील बदल यामुळे शहराला काही प्रमाणात दिलासा मिळाला. ‘शक्ती’ हे नाव WMO/ESCAP या आंतरराष्ट्रीय चक्रीवादळ नामांकन योजनेअंतर्गत श्रीलंकेने सुचवलेले आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातही पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांत, विशेषतः चेन्नई परिसरात, शनिवारी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला.

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. राज्यात ढगाळ आकाशासह ऊन- सावल्यांचा खेळ सुरू आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून अनेक ठिकाणी पारा तिशीपार गेला आहे. शनिवारी अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, आज रविवारी विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

यंदा मोसमी पावसाचे आगमन आठवडाभर आधीच झाले असले तरीही त्याच्या परतीचा प्रवास मात्र लांबला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी २६ सप्टेंबर रोजी संपूर्ण राजस्थान, जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधून माघार घेतली आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांतून मोसमी पाऊस परतला. त्यानंतर आठवडाभरापासून परतीचा प्रवास थांबल्याने वेरावल, भरूच, उज्जैन, झांसी, शहाजहानपूरपर्यंतची मॉन्सूनच्या माघारीची सीमा शनिवारी कायम होती.