चंद्रपूर : ॲड. असीम सरोदे व डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या “निर्भय बनो” जाहीर सभेला चंद्रपुरात मिळालेला भरघोस प्रतिसाद भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. अतिशय नियोजनबध्द पध्दतीने या सभेसाठी प्रचार प्रसार केला गेला. त्याचाच परिणाम सभेला सर्वसामान्य लोकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे भाजपाचे धाबे दणाणले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही निर्भय चंद्रपूरकर”च्या बॅनरखाली निर्भय बनो जाहीर सभेचे आयोजन न्यू इंग्लिश क्रीडांगण येथे करण्यात आले होते. या सभेला सर्वसामान्य लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या सभेची तयारी साधारणत: एक महिन्यापूर्वी अतिशय नियोजनबध्द पध्दतीने सुरू झाली. विशेष म्हणजे, सभा होणार असली तरी सभेबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली. सभा कोणत्या तारखेला होणार याबाबत देखील कमालीची गुप्तता पाळली गेली.

हेही वाचा…नागपूर, रामटेकमध्ये भाजप-काँग्रेस थेट लढत….पण, काँग्रेसचे उमेदवारच ठरेना…..

या सभेसाठी सर्वप्रथम अडानी भगाव, जंगल बचाव आंदोलनाचे प्रणेते पर्यावरणवादी बंडू धोतरे, पर्यावरण अभ्यासक डॉ.योगेश दुधपचारे व काँग्रेस पदाधिकारी उमाकांत धांडे हे तीन जण एकत्र आले. निर्भय बनोच्या सभेसाठी या तिघांनी पहिली बैठक घेतली. त्यानंतर हळूहळू समाजातील वेगवेगळ्या घटकांना यासोबत जोडण्याचे काम तिघांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून किल्ला स्वच्छता अभियानाचे तसेच इतरही माध्यमातून पर्यावरणवादी तथा वन्यजीव अभ्यासक बंडू धोतरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

मात्र देशभरात मोदी सरकार पर्यावरणाचे कायदे धाब्यावर बसवून उद्योगांच्या भल्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड करीत असल्याचा आरोप करून धोतरे यांनी ठोस भूमिका घेतली. त्यानंतर ॲड.असीम सरोदे, डॉ.विश्वंभर चौधरी, निखील वागळे यांच्याशी संपर्क साधला गेला. सभेची तारीख ठरली. प्रचार प्रसारासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले. कुणबी समाजाच्या सभागृहात शंभर ते दीडशे लोकांची एक बैठक झाली. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे, श्याम पांढरीपांडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर एकेक जण “आम्ही निर्भय चंद्रपूरकर” शी जुळत गेला.

हेही वाचा…लोकसभा निवडणुकीबरोबर राज्यात विधानसभेच्या एका जागेसाठी होणार पोटनिवडणूक, वाचा सविस्तर…

भाजी विकणाऱ्या पासून तर ऑटो चालक, रिक्षा चालक, फळ विक्रेते, विद्यार्थी, तरुण, तरुणी, सेवानिवृत्त अधिकारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षकांपासून तर विविध सामाजिक संघटना, कलावंत व सर्वसामान्य व्यक्ती या मोहिमेसोबत जुळले. त्यानंतर शहरातील विविध चौकात या मोहिमेत सहभागी झालेल्यांनी स्वत: खर्च करून पोस्टर, बॅनर, लावले. सभेसाठी एलईडी, ध्वनिक्षेपक तथा इतरही खर्च समाजातील विविध दानशुरांनी केला. या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की गुरूवार १४ मार्चच्या निर्भय बनोच्या जाहीर सभेत हजारोनी लोक सहभागी झाले.ही गर्दी बघून भाजपाच्या उरात धडकी भरली आहे. लोकांच्या मनातील हा असंतोष मतदानाच्या दिवसापर्यंत टिकून राहिला तर भाजपाचे कठीण आहे, अशीच सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asim sarode and vishwambhar chaudhary s nirbhay bano meet organized in chandrapur rsj 74 psg