नागपूर : अरण्यऋषी व पद्मश्रीने सन्मानित दिवंगत मारुती चितमपल्ली आणि पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात पाच ते बारा नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो. मात्र, याच पक्षीसप्ताहात दुर्मीळ पक्ष्यांची शिकार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.

राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी या उद्देशाने तसेच पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, संकटग्रस्त, धोकाग्रस्त पक्षी व त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्यांविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाच ते बारा नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याबाबत २७ ऑक्टोबरला २०२० ला शासन आदेश काढण्यात आला. मात्र, आता शासनालाच या पक्षी सप्ताहाचे गांभीर्य राहिले नाही.

नागपूरात मुख्यालय असताना गेल्या तीन दिवसात एकही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. तर नुकतेच आता पक्ष्यांच्या शिकारीचा प्रकार उघडकीस आला. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात हा प्रकार उघडकीस आला. व्याहाड उपवनक्षेत्रातील मौजा उमरीलगतच्या तलावात रेशाळ कंठाची भिंगरी (स्ट्रीक थ्रोटेड स्वालो) या संरक्षित प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. हे चारही आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील असून लोमेश धोंडू गेडाम, प्रताप बालाजी जराते, अरविंद धोंडू गेडाम, मुखरु सखाराम मेश्राम अशी त्यांची नावे आहेत.

शुक्रवारी, सात नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास उमरी तलाव परिसरात वनकर्मचारी पक्षीनिरीक्षण करत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. वनखात्याच्या पथकाने त्याठिकाणी धडक देताच शिकाऱ्यांनी पकडलेल्या पक्ष्यांचा मोठा साठा त्यांच्याकडे आढळला. वनखात्याने मुद्देमालासह चौघांनाही ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या कलम ९, ३९, ४९, ५०, ५१ अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास विभागीय वनाधिकारी राजन तलमले, सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे करत आहेत. वनविभागाच्या पथकाने शिकाऱ्यांकडून शिकारीसाठी वापरलेले आठ जाळे, पाच पिशव्या, नायलॉन दोऱ्या, १६ बांबू काठ्या, आठ लाकडी खुंट्या, दोन दुचाकी वाहने तसेच सुमारे २२५ मृत पक्षी जप्त केले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, वनक्षेत्र सहाय्यक अनंत राखुंडे, वनरक्षक महादेव मुंडे, भोलेश्वर सोनेकर, एकनाथ खुडे, आर.एस. डांगे, स्थानिक प्राथमिक प्रतिसाद दल, कक्ष मदतनीस यांच्या संयुक्त पथकाने केली.