नागपूर : Devendra Fadnavis On Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक रोज आक्रमक होत आहेत, तर दुसरीकडे ओबीसींच्या आंदोलनाला धक्का लागू नये म्हणून ओबीसी समाजाचेही आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ओबीसींमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर पूर्व विदर्भातील भाजपच्या आमदारांनी एकत्र येत जरांगे यांच्यावर विविध आरोप केले. तसेच ओबीसींमधून आरक्षण मिळण्याची त्यांची मागणी मान्य होणे अशक्य असल्याचे सांगितले.

मनोज जरांगे वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत आहेत. यावरून या आंदोलनाला कुठून रसद पुरवली जाते हे सरकारला माहिती आहे. जरांगे यांची मागणी असली तरी ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू दिला जाणार नाही. त्यांना न्यायालयात टीकेल असेच वेगळे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी दिले. पूर्व विदर्भात ओबीसी समाजाची संख्या मोठी आहे. हा समाज मागील निवडणुकांमध्ये भाजपसोबत कायम उभा राहिला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील आमदारांनी पंकज भोयर यांच्या नेतृत्वात प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत ओबीसींच्या आरक्षणाला सरकार धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन दिले.

भोयर म्हणाले की, मुंबईमध्ये जरांगेंचे आंदोलन सुरू असून नागपुरात ओबीसी समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये आपल्या आरक्षणाला धक्का लागेल का अशी भीती आहे. मात्र, सरकार पूर्णपणे ओबीसींसोबत असून त्यांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले. अनेक योजनांच्या माध्यमातून मराठा तरुणांना नोकरी आणि व्यवसाय देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाला आताही न्यायालयात टीकेल असे आरक्षण देण्याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे. मात्र, ओबीसींमधून आरक्षण देणे शक्य नाही, असेही भोयर म्हणाले. ओबीसी बांधवांना आज लेखी आश्वासन देऊ शकत नसलो तरी सरकारचा प्रत्येक प्रतिनिधी ओबीसींच्या आरक्षणाचा धक्का लागणार नाही हे सांगतो आहे. ओबीसी समाजाला विश्वास देण्यासाठीच आम्ही एकत्र आल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी खासदार रामदास तडस, सुनील मेंढे, आमदार कृष्णा खोडपे, आमदार प्रवीण दटके, आमदार समिर मेघे आदींची उपस्थिती होती.

पवार केवळ भावना भडवण्याचे काम करतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे मराठा बांधवांच्या भावना भवकवण्याचे काम करतात, असा आरोप पंकज भोयर यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संविधानात बदल करायचा असेल तर इतके वर्षे सत्तेत असताना पवारांनी काय केले?, असा प्रश्नही भोयर यांनी केला.