बुलढाणा : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांची (इंडिया आघाडी) मते फुटल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटांची मते असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमची अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली नसल्याचा दावा त्यांनी येथे केला. महाविकास आघाडीची मते फुटल्याची शक्यतादेखील त्यांनी फेटाळून लावली.

शिंदे आज, गुरुवारी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार शिंदे यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली नसल्याचे ठामपणे सांगितले. मराठा आरक्षण व शासन निर्णय आणि ओबीसी संघटनांचा विरोध, यांवर विचारणा केली असता त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर काढण्यात आलेला अध्यादेश हा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय आहे. असे असेल तर तर मग त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी, सत्ताधारी पक्षाचे नेते त्याविरोधात जाहीर नाराजी का व्यक्त करीत आहेत? या विषयावर अंतर्गत चर्चा झाली, असे ते म्हणतात. मग त्यावर काही नेते जाहीर चर्चा करण्याचे कारण तरी काय, असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले.

मराठा आरक्षणाचा निर्णय या सरकारने घेतला, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. छगन भुजबळ या सरकार मध्ये मंत्री आहेत. त्यांना समजवण्याची जबाबदारीदेखील या सरकारचीच आहे. सरकार दोन समाजात वाद, गैरसमज निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला. मराठा व ओबीसी या दोन्ही समूहाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळून दोन्ही समूहांत फूट पाडायची आणि त्याचा राजकीय लाभ घ्यायचा, असे सरकारचे धोरण तर नाही ना? असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आयपीएस अधिकारी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थन केले का? असा प्रश्न केला असता त्यांनी याचे खंडण केले. रोहित पवार यांनी मत, शंका बोलून दाखविली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आमदार शिंदे म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष माजी आमदार रेखा खेडेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.