चंद्रपूर : गणपती उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५४० जणांविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी यासाठीच या सर्वांवर हद्दपारीची कारवाई केल्याचे पोलीसांनी कळविले आहे.चंद्रपूर व बल्लारपूर शहरात शनिवार ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आहे. तर रविवार ७ सप्टेंबर रोजी राजुर, मूल आणि वरोरा येथे आणि ८ सप्टेंबर रोजी भद्रावती, ब्रम्हपुरी येथे गणेश मूर्तीचे विसर्जन आहे. चंद्रपूर जिल्हा, महापालिका व पोलीस प्रशासनाने विसर्जनाची तयारी सुरू केली आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीत शांतता कायम राहावी यासाठी ५४० जणांना हद्दपार करण्यात आले आहे. भारताची राज्यघटना आम्हांस सर्वधर्म, समभाव, धर्मनिरपेक्षता अशी शिकवण देते, मात्र काही समाज विघातक प्रवृत्ती या मुळ संकल्पनेलाच मोडीत काढुन देशात अराजकता पसरविण्यात सतत प्रयत्नशील असतात. अशा प्रवृत्तीला आळा घालुन आपली परंपरा, सण-उत्सव उत्साहाने साजरे करणे व त्याचवेळी शांतता, सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे फार महत्वाचे असल्याने श्री गणेश उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हयातील शांतता व सामाजिक सलोखा कायम रहावा आणि कायदा व सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नेतृत्वात जिल्हयातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी आप-आपले पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता भंग करणारे एकुण ५४० इसमाविरुध्द कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ अन्वये संबंधीत पोलीस स्टेशन हद्दीत येण्यास मनाईचा हूकूम व्हावा म्हणुन प्रस्ताव तयार करुन उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवून ५४० इसमांविरुध्द त्यांच्या हद्दीत येण्यास मनाई (हद्दपार) चा आदेश पारीत करुन घेण्यात आला आहे.
अनंत चतुर्दशीला श्रीगणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महापालिकेचे १०० हुन अधिकारी कर्मचारी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत. विसर्जनाच्या दिवशी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट,जिल्हा परिषदेच्या एका बाजुस विसर्जनाच्या दिवशी दुकाने लावण्यास प्रशासनद्वारे मनाई केली आहे.
विसर्जन स्थळाची आयुक्त विपीन पालीवाल यांनी पाहणी केली व सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. प्रशासनाद्वारे विसर्जन सुरळीत होण्याच्या दृष्टीने शहरातील विसर्जन मार्गावरील पावसामुळे निर्माण झालेले खड्डे भरून काढण्यात येत आहेत. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग तसेच वाहतुक व्यवस्थेची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविली जात आहे. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. विद्युत विभागामार्फत सर्व कृत्रिम तलाव, जटपुरा गेट, मुख्य मार्ग, विसर्जन मार्ग, विसर्जन स्थळ तसेच संपूर्ण शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था तसेच जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाच्या चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन गांधी चौक, जटपुरा गेट व दाताळा रोडवरील मुख्य विसर्जन स्थळी अँब्युलन्सची व्यवस्था आहे.
जटपुरा गेट येथे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप व स्टेज उभारणी करण्यात येणार आहे. यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय कार्यरत ठेवण्यात येणार आहे.