चंद्रपूर : चंद्रपुरात भाजपचे दोन आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या गटांतील संघर्ष चांगलाच पेटला आहे. महापालिका व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दोन मांडवांत १०० मीटरचे अंतर ठेवण्याचे दिलेले निर्देश दोन्ही गटांनी पायदळी तुडवले. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी दोन्ही गटांच्या मांडवात केवळ दहा फुटाचेच अंतर असल्याने या संघर्षाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत. यामुळे पोलिसांनी दोन्ही मांडवांच्या मध्यभागी कठडे लावून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
मुनगंटीवार समर्थक तथा भाजपचे माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांना लोकमान्य टिळक शाळेच्या उजव्या, तर जोरगेवार समर्थक तथा भाजपचे विद्यमान महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना डाव्या बाजूला स्वागत मांडवासाठी नाहरकत प्रमाणपत्र महापालिकेकडून देण्यात आले. तत्पूर्वी पावडे यांनी लोकमान्य टिळक विद्यालयासमोर मांडव उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यानंतर लगेच चार दिवसांनी कसनगोट्टूवार यांनी त्याचस्थळी मांडव उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, असा अर्ज महापालिकेकडे केला होता.
यानंतर मांडवाच्या ठिकाणी मुनगंटीवार व जोरगेवार गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनाही घटनास्थळ गाठावे लागले.
महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी शाळेच्या उजव्या बाजूला पावडे, तर डाव्या बाजूला कासनगोट्टूवार यांना मांडवासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले. दोन्ही गटांनी तीन दिवसांपूर्वीच जागा ताब्यात घेऊन तिथे मांडवांच्या कामाला सुरुवात केली आहे. आधी या दोन्ही मांडवांत दहा मीटरचे अंतर होते. यावरून दोन्ही गटांत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता असल्याने दोन्ही मांडवात १०० मीटरचे अंतर ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले.
मात्र, जोरगेवार समर्थक कासनगोट्टूवार यांनी शंभर मीटर अंतरावर मांडव उभारण्यास नकार दिला. त्यांनी मुनगंटीवार गटाच्या मांडवापासून अवघ्या दहा फुट अंतरावरच मांडव उभारायला सुरुवात केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे पोहोचला. तरीदेखील कासनगोट्टूवार यांनी माघार घेतली नाही. अखेर पोलिसांनी या दोन्ही मांडवांच्या मध्यभागी कठडे उभारले. यामुळे शनिवारी विसर्जन मिरवणुकीत दोन्ही गटांतील संघर्षाचा स्फोट होण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्तांची डोळेझाक कारणीभूत?
महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या काही निर्णयांमुळे शहरात मागील काही दिवसांपासून वाद उद्भवले आहेत. पालिवाल यांनी आमदार जोरगेवार यांच्या मित्राच्या वादग्रस्त भिंतीला परवानगी दिली होती. यावरून मोठा वाद झाला. यानंतर जोरगेवार यांच्या दिवंगत मातोश्रीच्या नावाने गांधी चौकात ‘अम्मा चौक’ उभारण्याला आयुक्तांनी परवानगी दिली. त्यावरूनही वाद उफाळल्यामुळे हे बांधकाम पाडण्याची नामुष्की पुरातत्त्व खात्याच्या हस्तक्षेपानंतर पालिवाल यांच्यावर आली. आता मांडव परवानगीवरूनही भाजपच्या दोन गटांत वाद उफाळून आला आहे. त्यामागे पालिवाल यांचीच डोळेझाक कारणीभूत आहे, अशी चर्चा शहरात सुरू आहे.