नागपूर : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या जी.आर.ला विरोध आहेत. परंतु त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसींसाठी मंत्रिमंडळात एकमेव आशेचे किरण आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आज नागपुरातील महात्मा फुले सभागृहात कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी विचारपीठावर आमदार पंकज भुजबळ, ईश्वर बाळबुद्धे, जावेद पाशा, दिवाकर गमे, अरुण पवार उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना भुजबळ यांनी सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा जी.आर.च्या विरोधात विविध संघटनांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या आहेत. यामध्ये हा जी.आर. रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्या सुधारणा करा, अशी मागणी करण्यात आली. सोबतच यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात फडणवीस हे ओबीसींसाठी केवळ एकमेव आशेचे किरण आहेत. हैदराबाद गॅझेटनंतर निर्माण झालेल्या ओबीसींच्या प्रश्नावर मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याची मागणी केली. ती लगेच मान्य केली. ओबीसींना निधी देण्याची मागणी केली आणि निधी वितरित करण्या सुरुवात झाली. मराठा समाजातील काहींनी बनावट प्रमाणपत्र तयार केले आहेत, असा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा त्यांनी खोटी प्रमाणपत्र असतील तर त्यांना शिक्षा केली जाईल, अशी भूमिका घेतली.
फडणवीस यांनी त्यांचा डीएनए ओबीसी असल्याचे सांगितले आहे. सरकार ओबीसी डीएनएमुळे आहे. हे सरकार ओबीसींचे आहे, असे ते म्हणाले आहेत. मात्र, आता त्यांना ते कृतीतून दाखवावे लागेल. ओबीसींना सांभाळतो हे दाखवावे लागले. ज्यावेळी ते ओबीसींना सांभाळतील त्यावेळी दलित, आदिवासी आणि इतर सगळे लहान समाज त्यांच्या पाठिशी मागे उभे होतील, कारण ते गरिबांचे ‘मसिहा’ ठरणार आहेत. पण, त्यासाठी कुठल्याही दबावाला बळी पडता कामा नये, असेही भुजबळ म्हणाले.
जातीनिहाय जनगणनेसाठी मोदींचे अभिनंदन
देशातील आरक्षणाचा प्रश्न जातीनिहाय जनगणेने सुटणार आहेत. त्यासाठी आम्ही २०१० मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. तत्कालिन केंद्र सरकारने ते मान्य केले होते. पण, राज्य सरकारवर ती जबाबदारी टाकली. आमची फसवणूक झाली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही मोदींचे अभिनंदन करतो, असेही छगन भुजबळ म्हणाले.