भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा प्रचार शिलेदारांनी सुरू केला आहे. राज्यात मिशन ४५ अंतर्गत महाविजयासाठी उत्सुक असलेल्या मतदारसंघातील महायुतीचे नेते व कार्यकर्ते यांना भाजपाने योग्य उमेदवार दिल्यास तोच उमेदवार निवडून येईल हा भाजपला आत्मविश्वास आहे. मात्र भंडारा गोंदिया मतदार संघात इच्छुक उमेदवारांची गर्दी एवढी वाढली आहे की आता छातीठोकपणे विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला या मतदार संघात उमेदवार निवडण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत महायुतीचा उमेदवारच ठरला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे देशभर नावारूपाला आलेला भंडारा गोंदिया मतदारसंघ २०१४ पासून भाजपच्या ताब्यात आला आहे. २०१४ च्या मोदी लाटेमध्ये देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यातील एक नाव होते प्रफुल्ल पटेल या ठिकाणी तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष नाना पटोले यांनी पटेल यांचा पराभव केला होता. मात्र काही कारणास्तव पटोले यांनी भाजपला रामराम करत खासदारकीचा राजीनामा दिला. २०१८ ला झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा आपल्याकडे खेचून आणली. २०१९ साली पुन्हा एकदा नवख्या सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुध्दे यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव करीत भंडारा गोंदियाची जागा भाजपला मिळवून दिली. त्यावेळी भाजपने मेंढे यांचे नाव पुढे केले. संघ परिवारातील उमेदवार आणि पुन्हा एकदा मोदी लाट यामुळे पुन्हा भाजपने आपला गड शाबूत ठेवला. अर्थात, यामध्ये भाजपच्या विजयी उमेदवारांचा फार मोठा प्रभाव होता किंवा त्यांनी फार मोठी विकासकामे केली असे काहीच नव्हते, तर केवळ मोदी लाटेच्या प्रभावापुढे महा विकास आघाडीची सर्वच रणनीती निष्प्रभ ठरली होती.

हेही वाचा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात १८ लाख मतदार

आता २०२४ साली पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लागली आहे. यंदा मात्र मविआने ही जागा काँग्रेसला दिली असल्याने काँग्रेस कडून स्वतः आ. नाना पटोले, लाखनीचे डॉ. चंद्रकांत निंबार्ते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, माजी आमदार चरण वाघमारे यांचे नाव महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. मुळात भंडारा गोंदिया परिसरात भाजप व काँग्रेसला मानणारा असा वर्ग आहे. मात्र, नानाप्रेमी वर्ग मोठा आहे. त्यातच आ. पटोले यांनी विधानसभा गाजवत जिल्ह्यातील अनेक समस्यांना विधिमंडळात वाचा फोडण्याचे काम केले. यामुळे व अर्थात त्यांच्याइतका दुसरा प्रभावी नेता महाविकास आघाडीकडे नसल्यामुळे पटोले जो उमेदवार म्हणतील त्यांच्या नावावर सर्वांचे एकमत असेल. असे असले तरी अद्यापपर्यंत महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही, तरी त्यांनी प्रचारास जोरदार प्रारंभ केला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये उमेदवारी मलाच मिळाली असे सांगणाऱ्या नेत्यांमुळे भाजपाचे इतर इच्छुक संभ्रमात आहेत. भाजपचा उमेदवार घरचा की बाहेरचा असा तिढा असल्याने आपआपसात नेते मंडळींच्या आरोप-प्रत्यारोपांनी भाजपला जेरीस आणले आहे .

हेही वाचा : नागपूर : पुजाऱ्यासह चौघांनी केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

विद्यमान खा. मेंढेंसह माजी आ. फुके, विजय शिवणकर, संजय कुंभलकर, करंजेकर यांच्यासह अनेकजण या मतदारसंघात इच्छुक आहेत. या मतदारसंघात उमेदवारी मिळाली की आपला विजय निश्चित, असे प्रत्येकास वाटत असले तरी महाविकास आघाडी, आ. पटोले व माजी आमदार चरण वाघमारे यांच्या आव्हानास कमी लेखणे भाजपस महागात पडू शकते, अशी स्थिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader nana patole contest lok sabha election from bhandara gondia lok sabha constituency ksn 82 css