लोकसत्ता टीम

नागपूर : भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत अनेक गाड्यांना घडक दिली. पण संकेतवर अद्याप कारवाई झाली नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे ? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, नागपुरात ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली. ती कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांची आहे, अपघातानंतर कारच्या नंबर प्लेट्स काढून कारमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसले. म्हणजे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे. बजाजनगरमध्ये या कारच्या अपघातात एका व्यक्तीच्या खांद्याला मार लागला आहे. पण तो काही बोलण्यास तयार नाही. आणखी दोघेजण जखमी झाले आहेत तेही काही बोलत नाहीत. रात्री १२.३६ वाजता अपघात झाला मग १२.३० ते १ च्या दरम्यान संकेत बावनकुळेचे लोकेशन काय होते? संकेत बावनकुळेला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत असून ते दबावाखाली आहे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आणखी वाचा-गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती,अनेक मार्ग बंद, रुग्णालयात पाणी,रुग्णांचे हाल..

सत्ताधारी धनदांडग्या नेत्यांच्या मुलांसाठी जनतेचा जीव स्वस्त झाला आहे का? ‘हिट अँड रन’ प्रकरणात भाजपा व सत्ताधारी पक्षातील नेत्यांची मुले वा संबंधित लोकच जास्त दिसतात. राज्यातील जनतेच्या जीवाची किंमत महायुती सरकारला नाही. केवळ स्वतःच्या नेत्यांना आणि धन दांडग्याना वाचवणारेच हे सरकार आहे. मात्र याची किंमत येणाऱ्या काळात या सरकारला चुकवावी लागेल आता जनताच या सरकारला उत्तर देईल, असेही अतुल लोंढे म्हणाले.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होते काय ?

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपसह आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. याबाबत विचारणा केली असता काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, त्या तिकडे राहतात, ही घटना माझ्या मतदारसंघातील आहे, मला या सगळ्या प्रकरणात जास्त माहीत आहे. त्यांना माहीती नाही. संकेत बावनकुळे कार चालवत असता तर काँग्रेसने त्यांना सोडले नसते. यात तिघे सोबत होते, जेवण करायला गेले की मद्य प्राशन करून वाहन चालवत होते, याचा तपास व्हावा. यात येणाऱ्या दिवसात आणखी काय निष्पन्न होते त्यावर आमचे लक्ष असेल, असेही ठाकरे म्हणाले.