नागपूर : भाजप नेते व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठीत काँग्रेसची आज ”व्होट चोर गद्दी छोड’ संघर्ष यात्रा निघत आहे. त्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आंबेडकर चौकाच्या दिशेने निघाले आहेत. या चौकातून मेळाव्याच्या स्थळापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या मतदारसंघाचा उल्लेख करत मतचोरी आरोप भाजप आणि निवडणूक आयोगावर सर्वप्रथम केला. त्या कामठी विधानसभा मतदारसंघातून प्रदेश काँग्रेस ‘व्होट चोर गद्दी छोड’ अभियानाला सुुरवात करत आहे. प्रदेश काँग्रेसची जाहीरसभा ३ सप्टेंबरला कामठी येथे आयोजित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका लेखात केला. त्यात कामठी मतदारसंघाचे उदाहरण दिले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या महादेवपूरा येथील मतचोरीचे पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशन दिले. आता ते बिहारमधील एसआयआरच्या विरोधात व्होटअधिकार यात्रेवर आहेत. बिहारामध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशभरात भाजप आणि निवडणूक यांचे साटेलोटे आणि मतचोरी मुद्दा तापण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे. महाराष्ट्रात देखील विभागीय पातळीवर ‘व्होट चोर गद्दी छोड’ नारा घराघरात पोहोचवण्यासाठी काँग्रेसपक्ष विभागीय आणि जिल्हा स्तरावर सभा, हस्ताक्षर मोहीम, मशाल यात्रा काढणार आहे. त्याची सुरुवात कामठी येथून आज होत आहे.
विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली. मतदारसंघात ३५ हजार मतदार वाढले होते. यात १२ हजार मतदार शेवटच्या तीन दिवसात वाढल्याचा आरोप विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केला होता.
महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान २०२४ मध्ये ३२ लाख मतदार जोडले गेले. तथापि, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (महाविकास आघाडी) विजयी झालेल्या आणि विधानसभा निवडणुकांमधील पाच महिन्यांच्या कालावधीत ३९ लाख मतदार जोडले गेले. महाराष्ट्रात राज्यातील एकूण मतदार लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार का आहेत? महाराष्ट्रात अचानक मतदार का निर्माण झाले आहेत. निवडणूक आयोगाने या प्रश्नांची उत्तरे मागूनही दिलेली नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
महाराष्ट्र निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाले आहेत. पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात मतदार का वाढले? पाच वर्षात ४४ लाख असताना पाच महिन्यात ३९ लाख कसे आले? मतदारयादीत अनेक अनियमितता झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फोटोसह मतदारयादी देण्याची मागणी केली होती.