नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर मतदारसंघात भाजपचे प्रवीण दटके यांनी काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंचा पराभव केला. निवडणुकीत दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. परंतु निवडणुकीत दटके जिंकल्यावर काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी दटके यांची भेट घेत असे काही केले की संपूर्ण नागपूरकरांना मराठी संस्काराचे दर्शन घडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य नागपुरातील निवडणुकीत भाजप- काँग्रेस कार्यकर्ते येथे अनेकदा सामोरासमोर आले. महालातील बडकस चौकातून प्रियंका गांधींचा रोड-शो सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवल्यावर गोंधळ उडाला. मतदानाच्या दिवशीही बंटी शेळके यांनी भाजपच्या ‘मत चिठ्ठी’ मतदान केंद्रावर सापडल्यानंतर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर मोमीनपुरात पोलिसांनी नाकाबंदी केल्याचा आरोप करत एका समाजाला मतदानापासून रोखण्यात येत असल्याचा आरोप करत पोलिसांशी वाद घातला.

हेही वाचा – सिंदखेडराजा, मेहकरला मिळाले नवीन नेतृत्व! तीन दशकानंतर…

निवडणुकीच्या दिवशी बंटी शेळके यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपातून ताब्यात घेण्यात आले. मतदान संपल्यावर मध्य नागपुरातील बडकस चौकातच काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. अतिरिक्त ईव्हीएम यंत्र घेऊन जात असलेली वाहने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गैरसमजातून अडवून त्याची काचे फोडली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आमदार प्रवीण दटकेंना घेरले. धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे पोलिसांनी बंटी शेळके यांच्यासह काही कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या सगळ्या घटना बघता मतमोजणीनंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद वाढण्याची शक्यता होती. पण घडलं अगदी विपरीत. निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे बंटी शेळके आणि भाजपचे आमदार प्रवीण दटके यांचे मनोमिलन झाले. बंटी शेळके स्वत: प्रवीण दटके यांच्याकडे गेले. तेथे त्यांनी प्रवीण दटके यांची गळाभेट घेतली. त्यानंतर दोघांनीही असे केले की मराठी संस्काराचे दर्शन घडले.

हेही वाचा – जेईई परीक्षेत मोठा बदल, या विद्यार्थ्यांना फटका बसणार

बंटी शेळकेंनी प्रवीण दटकेंना…

प्रवीण दटके विजयी झाल्यानंतर बंटी शेळके हार, श्रीफळ आणि पेढे घेऊन प्रवीण दटके यांच्याकडे पोहोचले. दोघांनी एकमेकांचा सत्कार केला. एकमेकांचे तोंड गोड केले. एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर बंटी शेळके यांनी वयाने मोठे असल्याने प्रवीण दटके यांच्या पाया पडत त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वादही घेतले. त्यामुळं मध्य नागपुरात खऱ्या अर्थाने आता निवडणूक संपली, नाते जोपासण्याची वेळ आली, हा संदेश दोन्ही नेत्यांनी दिला. बंटी शेळके आणि प्रवीण दटके हे नागपूर महापालिकेतील सहकारी. दोघेही नगरसेवक. त्यानंतर प्रवीण दटके विधान परिषदेचे आमदार झालेत. २०१८- १९ पासून बंटी शेळके मध्य नागपुरात निवडणुकीची तयारी करीत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darshan of marathi sanskar in nagpur congress candidates bunty shelke and pravin datke mnb 82 ssb