नांदेड : जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि हिमायतनगर नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. तथापि महायुती आणि महाविकास आघाडीबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नसला, तरी या पक्षाने सर्व ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत, तर बिलोलीमध्ये भाजपतर्फे उमेदवारी भरणाऱ्या बहुतांश उमेदवारांनी पक्षांतर्गत वादातून शेवटच्या क्षणी ‘राष्ट्रवादी’चे घड्याळ बांधून घेत या पक्षातर्फे अर्ज भरले.

जिल्ह्यामध्ये भाजपाचे पाच आमदार आणि राज्यसभेचे दोन खासदार आहेत; पण देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या मतदारसंघातील बिलोली नगरपरिषदेमध्ये या पक्षाने ऐनवेळी अनाकलनीय भूमिका घेतल्यामुळे या पक्षाकडून नगराध्यक्ष तसेच नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या बहुतांश उमेदवारांनी शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणुकीमध्ये उडी मारली. देगलूर नगरपरिषदेतही भाजपला नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार मिळाला नाही.

वरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपा, राष्ट्रवादी (अ.प.) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांपैकी हदगाव नगरपालिकेत भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याचे दिसत आहे तर बहुतांश ठिकाणी भाजपच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले असल्याचे शेेवटच्या दिवशी स्पष्ट झाले.

काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीबाबत अद्याप स्पष्ट चित्र समोर आलेले नाही. काँग्रेसने सर्वच ठिकाणी अध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीलाही आपल्यासोबत घेतले असून या आघाडीला वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये काही जागा सोडण्यात आल्या आहेत. खासदार अशोक चव्हाण यांच्या भोकरमध्ये काँग्रेसने नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले असल्याचे पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याआधी जिल्ह्यात काही ठिकाणी शेवटच्या क्षणी पक्षांतरे झाली. भाजपाने हिमायतनगरमध्ये काँग्रेसच्या डॉ. राजेंद्र वानखेडे यांना फोडून त्यांना नगराध्यक्षपदासाठी उभे केले तर लोह्यामध्ये अशोक चव्हाण यांचे समर्थक शरद पवार यांनी स्थानिक वादातून पक्ष सोडला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी उभे केले आहे. भाजपाचे बी. आर. कदम यांचे जावई स्वप्निल लुंगारे हे कंधारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. भोकरमध्ये काँग्रेसच्या सुभाष किन्हाळकर यांनी शेवटच्या क्षणी शिवसेने (एकनाथ शिंदे) तर्फे नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. कंधारमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मन्नान चौधरी यांनीही शेवटच्या क्षणी पक्षत्याग करून आमदार चिखलीकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बिलोलीत भाजपचे इंद्रजित तुडमे हे रात्रीतून घडलेल्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाले.

वरील निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान १३ संस्थांमध्ये नगराध्यक्षपदासाठी ३७ तर नगरसेवक पदासाठी ५१४ अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी सर्वच ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडाल्यामुळे सायंकाळपर्यंत संपूर्ण तपशील मिळाला नाही.

बिलोलीत भाजपाची नाचक्की

जिल्ह्यातील बहुसंख्य नगरपालिकांमध्ये राजकीय पक्षांमध्ये लढती होत असताना बिलोली नगरपरिषदेत मात्र भारतीय जनता पक्षातल्या एका गटाने अचानक एक आघाडी तयार केली. माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्याकडे या आघाडीचे नेतृत्व आहे. या अनाकलनीय निर्णयानंतर दुसरे माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे यांच्या नेतृत्वाखालील गटाने रविवारी रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधत या पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. त्यानंतरची मोहीम ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी सोमवारी पार पाडली.