गडचिरोली : युती असतानाही भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात पुतण्याला पाच कोटींची मदत करून मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने माझ्याच बाजूने कौल दिला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेतून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

भाजपच्या ताब्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शीत १२ ऑक्टोबरला नगरपंचायतच्या प्रांगणात राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जनकल्याण यात्रेनिमित्त सभा झाली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र  वासेकर,सिनेट सदस्या तनुश्री  आत्राम, रायुकाँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे आदी उपस्थित होते. सभेपूर्वी शहरातून पायी फेरी काढण्यात आली.

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, गेल्या ५० वर्षांपासून मी राजकारणात आहे. यादरम्यान कधी यश, कधी अपयश आले, पण जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत मला विधानसभेत पाठविले आहे. मात्र, भाजपने माझ्याविरोधात रणनीती आखत माझ्याच पुतण्याला माझ्याविरोधात उभे केले, पाच कोटी रुपये खर्च केले, असा आरोप त्यांनी केला.  कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे. सध्या भेंडाळा परिसरातील १४ गावांतील जमिनी उद्योगासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली आहेत, पण आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून एक इंचीही जमीन जाऊ देणार नाही, कोणी शेतकऱ्यांना दबावात घेत असेल तर ते कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : मिटकरी

पूर, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. महायुती सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली. यापुढेही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.  गडचिरोली हा क्रांती करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे.  या जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार खंबीरपणे सोबत असल्याचेही ते म्हणाले.

तर स्वबळावर लढणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी  प्रस्ताव दिला तर ५१ पैकी ३२ जागा मागू, अन्यथा राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वबळावर लढेल, असे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. जिल्हा परिषदेसाठी सर्व ५१ व पंचायत समितीच्या १०२ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अहेरी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व १९ जागांवर पक्ष लढेल, असे सांगून त्यांनी तिथे इतर पक्ष आहेतच कुठे, असा प्रश्न करुन भाजपसह काँग्रेस नेत्यांवर उपरोधिक टीका केली.