नागपूर : गणपती विसर्जनामुळे मुस्लीम समाजाने मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक ५ सप्टेंबरऐवजी ८ सप्टेंबरला करण्याचे ठरवले आहे. हे बघता राज्य सरकारने ५ ऐवजी ८ सप्टेंबरची शासकीय सुटी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.मुस्लीम समाजाचा पवित्र असा मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी आहे. तर ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. त्यामुळे ५ तारखेची मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक ८ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय मुस्लीम समाजाने घेतलेला आहे, याची नोंद घेऊन ५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली शासकीय सुट्टी ८ सप्टेंबर रोजी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.

भारतात विविध धर्माच्या उत्सव, सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात. भारतीय संविधानाने सरकारचा कोणताही धर्म नसेल, भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल असे स्पष्ट नमूद केले आहे. परंतु प्रत्येकाला त्याचा-त्याचा धर्म आणि परंपरा पाळण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार या देशात पूर्वापार चालत असलेले सण, उत्सव मोठा उत्साहात साजर केले जातात. अनेक सणांना राज्य आणि केंद्र सरकार सुटी देखील जाहीर करत असते.

सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. त्यापूर्वी गौरी आणि आता गणपती आणि दुर्गा उत्सव असे हिंदू धर्माचे सण साजरे होतात. त्यासाठी सरकार सुटी देखील जाहीर करत असते. ई-ए-मिलादला देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे. परंतु मुस्लीम समाजाचा पवित्र असा मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी आहे. तर ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे, त्यामुळे ५ तारखेची मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक ८ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय मुस्लीम समाजाने घेतलेला आहे, याची नोंद घेऊन ५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली शासकीय सुट्टी ८ सप्टेंबर रोजी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मंत्री नसीम खान केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान म्हणतात की, राज्यात बंधुभाव व हिंदू मुस्लीम एकोपा अबाधित राखण्यासाठी मुंबईत विविध मुस्लीम संघटनांनी गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया खिलापत कमिटीमध्ये बैठक घेतली. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी मुंबईत काढण्यात येणारी मिरवणूक ही सोमवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे, जेणेकरून दोन्ही धर्माचे पवित्र सण हे प्रेम व सद्भावनेने साजरा करता येतील, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.