नागपूर: शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? अशी शंका वेळोवेळी उपस्थित केली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत.

अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केलेल्या एका विधानाची चर्चा सुरू झाली असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक महत्वपूर्ण विधान केले आहे. देशमुख म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात अशी कुठलीही चर्चा अद्याप तरी सुरू नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. केवळ माध्यम अशी चर्चा घडवून आणत असल्याचे ते म्हणाले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत आपलं काय मत आहे? अशी विचारणा केली असता शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला. “आमचं म्हणाल तर आमच्या पक्षात दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. त्यातला एक मतप्रवाह सांगतो की आम्ही (अजित पवार गट व शरद पवार गट) पुन्हा एकत्र यायला हवं. तर दुसरा गट सांगतो की कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाबरोबर जाता कामा नये. इंडिया आघाडीसोबत राहून विरोधकांची मोट पुन्हा एकदा बांधण्याचं मत या गटाचं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

बोगस शिक्षक भरती प्रकार

नागपूर जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीचे प्रकार झाले आहे. व्यापम पेक्षा मोठा घोटाळा असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. जुन्या तारखेत ३० लाख घेऊन बोगस नियुक्त्या करण्यात आल्या. १०५८ शिक्षक नागपूर जिल्ह्यात बोगस असल्याचा दावा त्यांनी केला. माझी शाळा कोणती आहे हे सुद्धा अनेक शिक्षकांना माहीत नाही. मृतक शिक्षण अधिकरी यांच्या स्वाक्षरीकरून बोगस नियुक्त्या केल्या आहेत. हजारो कोटींची घोटाळा असून निवृत्त न्यायाधीश मार्फत, चौकशी  झाल्याशिवाय  यात काही होणार नाही असेही देशमुख म्हणाले.