बुलढाणा: उठसूठ विरोधी नेते आणि विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारा भारतीय जनता पक्ष काय आहे, हे महाराष्ट्रातील  जनतेला चांगले माहीत आहे. मुळात भाजप काही धुतल्या तांदळा सारखा नाही. भ्रष्टाचारापासून अलिप्त नाही ,अशी परखड टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. यामुळे स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड मारू नये असा परखड सल्लाही या शेतकरी नेत्याने  भाजपला उद्धेशून दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Gold Rate Today In Nagpur : सोन्याच्या दरात मोठे बदल; सराफा बाजार उघडताच…

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद  विधानसभा मतदारसंघात आज शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात ते आले होते.यावेळी   माध्यम प्रतिनिधींसमवेत अनौपचारिक संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला. मी मागील सन २०१५  पासून सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आवाज बुलंद केला, त्यांच्या विचारसरणी आणि धोरणांना विरोध केला आहे. त्यावेळी शिवसेना पक्ष भाजपच्या वळचणीला बांधलेला होता. त्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांनी याचे  भान ठेवून बोलावे. तिसरी आघाडी ( परिवर्तन महाशक्ती) सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यासाठी या आरोपात तथ्य नाही. मुळात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांना एक प्रबळ पर्याय म्हणून आघाडी तयार करण्यात आली आहे. पंतप्रधान  मोदी यांनी गांधी घराणे आणि काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी असल्याची टीका केली आहे.मात्र भाजप काही वेगळा पक्ष नाही, तेही भ्रष्टाचार पासून अलिप्त नाही .मुळात भाजप आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे  भ्रष्टाचारिच आहेत.

हेही वाचा >>> कापूस, सोयाबीनची खरेदी आता हमीभावापेक्षा अधिक दराने; स्वत: उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या साक्षीने…

आघाडी प्रबळ पर्याय’

आजघडीला आमच्या तिसऱ्या आघाडीत (परिवर्तन महाशक्ती)मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमदार बच्चू कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष, स्वराज्य पक्ष, महाराष्ट्र विकास आघाडी, भारत राष्ट्र समिती, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना यासह विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहे. सत्ताधाऱ्यांना मदत नव्हे तर महायुती आणि महाविकास आघाडीला प्रबळ पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. आघाडीमुळे राज्यातील करोडो मतदारासाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील बहुतेक विधानसभा मतदारसंघात आम्ही सक्षम, चारित्र्यवान,  लोकाधार असणारे उमेदवार देणार आहोत, असा दावा राजू शेट्टी यांनी या चर्चेदरम्यान बोलून दाखविला.

राज्याचा सातबारा भाजपच्या…

राज्याचा सातबारा भाजपच्या नावाने नाही. त्यामुळे त्यांनी इतरांवर अनाठायी आरोप करू नये,असा टोला त्यांनी भाजपला लगावला.  यावेळी शेट्टी यांनी भाजप सरकारवर टीका केली. मागील पाच वर्षांच्या कालावधीत राज्याच्या राजकारणाचा दर्जा  अतिशय खालावला आहे. राज्यात राजकारण नव्हे तर टोळी युद्ध सुरू  असल्याचे दुर्देवी चित्र आहे. भाजप काय आहे हे लपून राहिलेले नाही.तो  आता सर्व कळलेला पक्ष आहे, असे शेट्टी यावेळी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana scm 61 zws