यवतमाळ : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली तरी कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली नाही. राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक जनता शेतीवर अवलंबून असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात आज ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. यवतमाळ येथे बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करत कशेतकऱ्यांनी सरकारविरुध्द आपला संताप व्यक्त केला. यावेळी पत्ते खेळून शासनाचा निषेध करण्यात आला.

या चक्काजाम आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), गोंडवाणा गणतंत्र पार्टी, एमआयएम, आम आदमी पार्टी आणि अपनी प्रजाहित पार्टी यांचा सक्रीय पाठिंबा मिळाला. तात्काळ शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी, सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस धोरण राबवावे, विधवा व अपंग शेतकरी महिलांसाठी रोजगार व सुरक्षा योजना लागू कराव्यात, मनरेगा अंतर्गत शेतीच्या कामासाठी पेरणी ते कापणीपर्यंत मजुरी व कामाचा विस्तार करावा, ग्रामीण तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगार संधी निर्माण कराव्यात यासह अनेक मागण्यांसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि शेतीची उपकरणे घेऊन रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. काही ठिकाणी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. “हे सरकार झोपले आहे, याला जागे करण्यासाठी आम्ही चक्काजाम आंदोलन करत आहोत, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. माजी मंत्री बच्चू कडू यांनी याआधी आमरण उपोषण आणि सात बारा कोरा यात्रा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या मागण्या दुर्लक्षित केल्या गेल्याने आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ येथे आंदोलनात बिपीन चौधरी, सुरज खोब्रागडे, देवा शिवरामवार, राजेन्द्र गायकवाड, किशोर इंगळे, गजानन पाटील, चंदन हातागडे, निलेश राठोड, कुणाल जतकर, पिंटु दांडगे, अमन चौधरी, जावेद काझी यांच्यासह सर्वच राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

पत्ते खेळून निषेध

राज्याचा शेतकरी संकटात असतांना विधानसभेत बसून कृषीमंत्री ऑनलाईन पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे यवतमाळ येथे बसस्थानक चौकात शेतक-यांनी पत्ते खेळून कृषीमंत्र्याचा निषेध केला. पोलिसांनी जिल्हाभरात शेकडो शेतकऱ्यांना आंदोलन केल्याप्रकरणी स्थानबध्द केले.