नागपूर : सरकारमधील चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असून त्यातला सुत्रधार मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जितला असल्याचा खळबळजनक दावा करीत शिवसेनेचे खासदार (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संजय राऊत यांनी केला आणि महाराष्ट्राचे सबंध राजकारण ढवळून निघाले.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विधिमंडळात स्पष्टीकरण देत आजी माजी मंत्र्यांवर असे, कोणतेही आरोप नसल्याची सारवासारवही करावी लागली. अधिवेशनाच्या शेवटी शेवटी मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेली असली तरी मर्जीतल्या नेत्यांना पाठीशी घातले जात असल्याने नागपुरातील राजकीय वर्तूळात संशय कल्लोळ उठला आहे.
हनी ट्रॅपची चर्चा होणे हा प्रकार तसा नवा नाही. यापूर्वी देशभरात अनेक वेळा गोपनिय माहिती काढून घेण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, शास्त्रज्ञ, राजकीय नेते, गुप्तचर संस्थांचे प्रमुख, तपास संस्थांचे अधिकारी यांच्या नावे ही चर्चा रंगली आहे.अगदी अलिकडचेच उदाहरण द्यायचे तर राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील संस्थांपैकी एक संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांचे प्रकरण ताजे आहे.
महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना हनी ट्रॅपच्या प्रकरणात अटक केली होती. व्हॉट्सअप आणि व्हीडिओ कॉल्सच्या माध्यमातून डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिला एजंटला संरक्षण क्षेत्रातील गुपिते शेअर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयातल्या एका वाहनचालकाला देखील अशाच प्रकरणात नोव्हेंबर 2022 मध्ये अटक केली होती. या वाहन चालकाने पाकिस्तानी महिलेला गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप होता.
हनी ट्रॅप काय असतो?
गुगलच्या सर्च इंजिनवर हनी ट्रॅप असा शब्द परवलीचा आहे. एखाद्या गुप्त तंत्रात, गोपनिय माहिती काढून घेण्यासाठी, फायदा मिळवण्यासाठी किंवा विविध उद्देशांसाठी उच्च पदस्थ व्यक्तींना टार्गेट करीत प्रलोभन देणे, त्यासाठी लैंगिक आकर्षणाचा वापर करणे, असे विकिपिडीया म्हणतो. हेरगिरीच्या इतिहासात हनी ट्रॅपची नेहमी चर्चा असते. एखाद्या व्यक्तीकडून राष्ट्राची सुरक्षा, संरक्षण दलातील गुपिते, राजकिय कुटनिती, डावपेचाशी निगडीत गोपनिय माहिती काढून घेण्यासाठी प्रेमळ किंवा लैंगिक नातं तयार करून त्या माध्यमातून अत्यंत संवेदनशील माहिती मिळविणे हा या हनी ट्रॅपचा मुख्य उद्देष. दिसण्यात माद, मोहक आणि संवादात पारंगत महिलांना त्यासाठी नेमले जाते. जोखीम अधिक असल्याने या महिलांना मोठी रक्कमही अदा केली जाते. गेल्या दशकभरात भारतासह इतर अनेक देशांमध्ये हनी ट्रॅपची डझनभर प्रकरणे समोर आली आहेत.
भारतातील हनी ट्रॅप
भारत आणि श्रीलंकेदरम्यान १९८७ ला झालेल्या शांती-कराराच्या अगदी काही दिवसांपूर्वी भारतीय गुप्तचर संस्था अर्थात रॉ चे अधिकारी असलेले के. व्ही. उन्नीकृष्णन यांना अमेरिकी गुप्तहेर संस्था सीआयएसाठी हेरगिरी केल्यावरून अटक झाली होती. उन्नीकृष्णन हे त्यावेळी चेन्नईच्या रॉ शाखेतून श्रीलंकेतील फुटीरवादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या हालचालींवर नजर ठेवून होते. त्यानंतर २०१० मध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे नियुक्तीवर असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील प्रेस-इन्फॉर्मेशन सचिव माधुरी गुप्ता यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तहेर संस्थेसाठी हेरगिरी केल्या प्रकरणात अटक केली होती.
अखेर २०२१ मध्ये माधुरी गुप्ता यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण मिटले. २०१९ मध्येही राज्यसभेत तत्कालिन संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी पाकिस्तानच्या आयएसआयकडून भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांना हनी ट्रॅप करण्याचे प्रयत्न वाढल्याचे मान्य केले होते. त्याच्या काही महिन्यांनीच भारतीय लष्कराने जवानांना मोबाईलमधून फेसबुक, टिकटॉक, ट्रू-कॉलर आणि इन्स्टाग्रॅमच्या वापरावर निर्बंध घातले होते.
संरक्षण दलाला शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या आयुध निर्माणी क्षेत्रातील उद्योग नागपूरच्या सभोवताल आहेत. त्यामुळे नागपूर हे हनी ट्रॅपसाठी कायम अलर्ट मोडवर असते. सुदैवाने आतापर्यंत अशी कोणताही तक्रार सायबर शाखेपर्यंत आलेली नाही. सेक्स्टॉर्शनच्या काही तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी एकाला ५० लाखांचा सेस्क्टॉर्शनमधून गंडा घातल्याची तक्रार आली होती. त्यावर तातडीने कारवाई झाली आहे.-लोहित मतानी, उपायुक्त सायबर शाखा
हनी ट्रॅपमध्ये कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक निशाणा साधला जातो. मोठ्या पदावर असलेल्यांची कमजोरी हेरून महिनो न महिने, वर्षा नुवर्ष पाळत ठेवली जाते. अन्य सायबर गुन्ह्यांमध्ये उपकरण टार्गेट केले जाते. मात्र हनी ट्रॅपमध्ये माणसाच्या मेंदूवर, सारासार विवेकाला जाळ्यात अडकवले जाते. हा सुनियोजित कटाचा भाग असला तरी यातले खरे गुन्हेगार जाळ्याच्या बाहेर असतात.-सुनिल सदाशिवन, सायबर तज्ज्ञ