नागपूर : सध्याच्या वाढत्या सोन्याच्या दरामुळे देशातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर सोन्याची तस्करी होत आहे. विशेषतः राजकोट, अहमदाबाद, मुंबई आणि पश्चिम बंगाल येथून ही तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. हे सोनं नागपूरच्या इतवारी येथील सराफा बाजारात बेकायदेशीररित्या विक्रीस आणलं जातं.
रेल्वे मार्गाचा वापर करून अनेक तस्कर मासिक किंवा सामान्य प्रवासी तिकीट घेऊन मौल्यवान धातू नागपूरमध्ये पोहोचवत आहेत. या तस्करीमुळे सरकारच्या महसुलाला मोठा फटका बसत असून, स्थानिक बाजारात बेकायदेशीर मालामुळे स्पर्धा असंतुलित होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाने गस्त आणि तपासणी वाढवली असून, अलीकडेच बिलासपूर-इतवारी एक्स्प्रेसमध्ये ३.३७ कोटींचे सोने व चांदी जप्त करण्यात आले.तपास यंत्रणांनी अशा बेकायदेशीर व्यवहारांवर लक्ष ठेवून कारवाई सुरू केली आहे. तरी नागरिकांनीही अशा संशयित हालचालींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (SECR) नागपूर विभागात मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीची तस्करी उघडकीस आणली आहे. बिलासपूर-इतवारी इंटरसिटी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून आरपीएफने तब्बल ३.३७ कोटी रुपयांचे सोने आणि चांदी जप्त केले आहे. ही कारवाई ११ ऑक्टोबर रोजी अमगाव ते गोंदिया दरम्यान करण्यात आली.
ही विशेष मोहिम विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कारवाईचे नेतृत्व सहाय्यक उपनिरीक्षक के. के. निकोडे यांनी केले. अमगाव ते गोंदिया दरम्यान गस्त घालताना स्लीपर कोचमधील एका संशयित व्यक्तीवर आरपीएफच्या पथकाचे लक्ष गेले. त्याच्याकडे मौल्यवान धातूंसारख्या वस्तू असल्याचा संशय बळावल्याने गोंदिया स्थानकावर गाडी आल्यावर त्याला खाली उतरवून चौकशीसाठी नेण्यात आले.
तपासादरम्यान संबंधित व्यक्तीची ओळख नरेश पंजवानी (वय ५५, रा. गोंदिया) अशी पटली. तो नियमित मासिक रेल्वे तिकीटावर प्रवास करत असल्याचेही समोर आले. मात्र, त्याच्याकडे या मौल्यवान वस्तूंचे कोणतेही दस्तऐवज किंवा पावत्या नव्हत्या. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २.६ किलो सोने (कीमत अंदाजे ३.२७ कोटी रुपये) आणि ७.४४ किलो चांदी (कीमत सुमारे १०.४७ लाख रुपये) आढळून आली. एकूण जप्त धातूंची किंमत ३.३७ कोटी रुपये एवढी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोन्या-चांदीच्या किंमती गगनाला भिडत असल्याने या मौल्यवान धातूंची बेकायदेशीर तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषतः राजकोट, अहमदाबाद, मुंबई आणि पश्चिम बंगाल येथून ही तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून, इतवारीच्या सराफा बाजारात ती बेकायदेशीरपणे विकली जाते. कर आणि शुल्क टाळण्यासाठी ही तस्करी करण्यात येते, जेणेकरून कमी दरात ही धातू विकता येतील.
बडनेरा स्थानकात २.११ कोटींचे सोने चोरी
दुसऱ्या एका घटनेत, १२ ऑक्टोबर रोजी, किशोर ओंकारप्रकाश वर्मा (वय ४४, रा. जळगाव) या सराफा व्यापाऱ्याचे २.३ किलो सोने (मूल्य २.११ कोटी रुपये) बडनेरा स्थानकात चोरीला गेले. वर्मा हे हावडा-मुंबई मेलने अमरावतीहून जळगावकडे प्रवास करत होते. त्यांनी आपले सोने असलेली बॅग डब्यातील दरवाज्याजवळच्या सामान रॅकमध्ये ठेवली होती. काही क्षणांच्या असावधतेचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बॅग पळवली.
या प्रकरणी बडनेरा जीआरपीकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही दोन्ही प्रकरणे लक्षात घेता रेल्वेमार्गाने मौल्यवान धातूंची तस्करी आणि चोरी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट होते.