नागपूर : राज्यात अडीज लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले-मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरू करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना नाना पटोले म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. याप्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच तरुण मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. यापूर्वी भाजपा युती सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला होता. मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती करणार नाही असे जाहीर करून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता. यानंतरही आरोग्य विभाग व एमपीएससीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने लिपीक व टंकलेखक भरण्यास सरकारने परवानगी दिली होती. भाजपच्या करनी व कथनीत फरक असतो. आताही अमरावती जिल्हा सत्र न्यायालय व एस. टी. महामंडळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी जाहिरात दिली आहे. भाजपा युती सरकारच्या काळात तहसीलदार व नायब तहसीलदार पदाचीही कंत्राटी भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची कंत्राटे भाजपाच्याच बगलबच्च्यांच्या कंपनीला दिली जातात. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीने नोकर भरतीचे आश्वासनही दिले होते त्याचा भाजपाला विसर पडलेला दिसत आहे. राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे पण भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही.

हेही वाचा…धक्कादायक! नागपुरातील बर्डी उड्डाण पुलावर १५ वाहने एकमेकांवर धडकली

एस.टी.ची भाववाढ

निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापनाही झालेली नाही तरी लगेच एस. टी. महामंडळाने तिकटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू झाली आहे. भाजपा सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले असून कंत्राटी भरती व एसटी भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजमाफी, शेतमालाला हमीभाव देईल, असे वाटत नाही असेही नाना पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government resumed contract recruitment congress demands cancellation or threatens to protest on streets dag 87 sud 02