गडचिरोली : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून सोमवारी भाजपमध्ये ‘हाय वोल्टेज ड्रामा’ बघायला मिळाला. अखेर नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्रणोती निंबोरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळपासून रीना चीचघरे आणि निंबोरकर यांच्या नावाची चुरस होती. निवडणुकांच्या घोषणेनंतरच दोन नावावरून भाजपमध्ये प्रचंड गटबाजी पाहायला मिळाली. दुसरीकडे काँग्रेसकडून आधीच उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या कविता पोरेड्डीवार यांनीही उमेदवारी अर्ज दखला केला.

गडचिरोली पालिकेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने, विशेषतः भाजपमध्ये उमेदवारीसाठी कमालीची रस्सीखेच पाहायला मिळाली. पक्षात अक्षरशः दोन गट पडले होते. भाजपमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेत महिला पदाधिकाऱ्यांत जोरदार चुरस होती. यामध्ये भाजप महिला जिल्हाध्यक्षा व माजी नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे, भाजप जिल्हा महामंत्री गीता सुशील हिंगे आणि प्रणोती सागर निंबोरकर आणि रीना चीचघरे यांची नावे आघाडीवर होती.

शेवटपर्यंत या नावांवरून तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, भाजपने शेवटच्या क्षणी प्रणोती निंबोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे यांचा थेट सामना काँग्रेसच्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांच्याशी होणार आहे. कविता पोरेड्डीवार या गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांच्या पत्नी असून त्या स्वतः निवृत्त प्राचार्या आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह काँग्रेस आणि भाजपच्या सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांनीही सोमवारी नामांकन दाखल केले.

आघाड्यांची जुळवाजुळव

नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला नगराध्यक्षपदाचा तिढा सुटल्यानंतर पालिकेत सत्तेचा ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी आघाड्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.भाजप आणि काँग्रेस स्वबळावर लढत आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदेसेनेने आघाडी केली आहे, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट), उद्धवसेना व मनसे एकत्रित येण्याची शक्यता आहे. अशातच, काँग्रेसनेही वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची तयारी सुरू केली असून, प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.