नागपूर : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून एक महत्त्वपूर्ण विधान केले. “संविधानामुळे मला भारताच्या सर्वोच्च संवैधानिक पदापर्यंत पोहोचता आले, पण राष्ट्र आणि समाज समजले ते डॉ. केशव बळीराम हेडगेवारांमुळे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
कोविंद म्हणाले की, “मी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातून आलो आहे. पण आज मी ज्या पदावर पोहोचलो, त्याचे संपूर्ण श्रेय भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाच्या तत्वांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीला जाते. मात्र, संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी दिलेले राष्ट्रप्रेम, सेवा आणि समरसतेचे बाळकडूही माझ्या जीवनात महत्त्वाचे ठरले.”
आपल्या राजकीय प्रवासाचे आणि संघाशी असलेल्या जुडलेल्या नात्याचे स्मरण करून दिले. “१९९१ साली मी भारतीय जनता पक्षाकडून कानपूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक लढवली. त्या काळात मला संघाच्या स्वयंसेवकांसोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली, असेही ते म्हणाले. कोविंद यांनी संघाच्या कामाची प्रशंसा करताना सांगितले की, “संघात जात, धर्म, पंथ, भाषा याचे कोणतेही भेद नाहीत. सर्व स्वयंसेवकांमध्ये समरसता आहे, हीच संघाची खरी ताकद आहे.” त्यांनी हेही नमूद केले की संघाचे माजी सरसंघचालक रज्जू भैय्या यांच्या सान्निध्यात संघाच्या कार्याची खरी ओळख झाली.
आपल्या भाषणात कोविंद यांनी एक ऐतिहासिक प्रसंग उघड केला. ९ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड (जि. सातारा) येथील संघ शाखेला भेट दिली होती. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधत संघाच्या कार्याचे कौतुक केले होते. “त्यांनी संघाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती,” असे कोविंद यांनी सांगितले. हे वृत्त ‘जनता’ आणि ‘केसरी’ या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, १६ सप्टेंबर १९४७ रोजी महात्मा गांधी यांनी दिल्लीतील संघ रॅलीला भेट दिली होती. त्यांनी संघाच्या शिस्तीचे आणि अस्पृश्यताविरोधी भूमिकेचे कौतुक केले होते. गांधीजींनी स्वतः आपल्या लेखनात संघात समता आणि बंधुता असल्याचे उल्लेख केले आहेत, असा दावा कोविंद यांनी केला. या वक्तव्यांमुळे डॉ. कोविंद यांनी संविधान, आंबेडकर, संघ आणि डॉ. हेडगेवार यांच्यातील ऐतिहासिक संदर्भ जोडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रणनितीचा पुरस्कार केला. राजकीय दृष्टिकोनातून हे वक्तव्य व्यापक चर्चा आणि विश्लेषणाला कारणीभूत ठरत आहे.