अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे परिक्षेत्रात साडेदहा महिन्यांत लाचखोरीच्या गुन्ह्यांच्या संख्येने पंचाहत्‍तरी गाठली आहे. याच कालावधीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुन्ह्यांच्या संख्येत १९ ने वाढ झाली आहे. राज्यात दररोज कोठे ना कोठे लाच घेताना सरकारी अधिकारी, कर्मचारी पकडले जात आहेत. लाचखोरीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत असून चालू वर्षी राज्यात १ जानेवारी ते १६ नोव्‍हेंबर या कालावधीमध्ये ७२८ लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एसीबीच्या नाशिक परिक्षेत्रामध्ये सर्वाधिक १४७ गुन्हे दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे परिक्षेत्रात १२७, छत्रपती संभाजीनगर ११६, ठाणे परिक्षेत्रामध्ये ९४ गुन्हे दाखल झाले आहेत. अमरावती परिक्षेत्रात दाखल झालेल्‍या गुन्‍ह्यांची संख्‍या ७५ वर पोहचली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा अमरावती परिक्षेत्रातील लाचखोरीच्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी साडेदहा महिन्यांमध्ये लाचेसंबंधी ५६ गुन्हे आणि एका अन्‍य भ्रष्‍टाचार प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. यंदाच्या लाचखोरीच्या ७५ गुन्ह्यांमध्ये लाच घेताना विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीदेखील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या असून एकूण आरोपींची संख्या १०४ इतकी आहे. यावर्षी आतापर्यंत अन्य भ्रष्टाचाराचा एक गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : इगतपुरी ते बडनेरादरम्‍यान १० रेल्वे धावताहेत १३० च्‍या वेगात!

शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी किंवा कर्मचारी यांच्‍यामार्फत नागरिकांची शासकीय कामे अडवून ठेवली जातात. अनेकवेळा लाचेची मागणी केली जाते. ‘लाच स्‍वीकारणे हा गुन्‍हा आहे’, असे फलक कार्यालयांमध्‍ये लावण्‍यात आलेले असतानाही लाचखोरीचे प्रकार थांबत नाहीत. त्‍याला आळा घालण्‍यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्‍यात येत आहे.

हेही वाचा : नागपुरात दिवसभर उत्साह अन् रात्री निराशा; भारतीय संघाच्या विश्वचषक पराभवाने क्रिकेटप्रेमीचा हिरमोड

यंदा १ जानेवारी ते १६ नोव्‍हेंबर या कालावधीत अमरावती परिक्षेत्रात सर्वाधिक गुन्‍हे हे अमरावती जिल्‍ह्यात नोंदविण्‍यात आले असून त्‍यांची संख्‍या १३ इतकी आहे. अकोला जिल्‍ह्यात १०, यवतमाळ १३, बुलढाणा १४ आणि वाशीम जिल्‍ह्यांत १५ गुन्‍ह्यांची नोंद झाली आहे. गेल्‍या वर्षी याच कालावधीत ५६ गुन्‍ह्यांची नोंद झाली होती. यंदा ही संख्‍या १९ ने वाढली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लावण्यात आलेले सापळे आणि पकडण्यात आलेल्या लाचखोरांमध्येही वृद्धी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati division 75 cases of government employees accepting bribe registered mma 73 css