बुलढाणा :जवळपास एक महिन्यापासून नियमित अंतराने पडणारा पाऊस, शेतमालाचे नुकसान, विजांचे तांडव आणि यावर कळस म्हणजे नदी नाल्याना आलेले पूर असा सध्या जिल्ह्यातील मौसमाचा माहोल आहे. यामुळे उन्हाळा की पावसाळा असा मजेदार प्रश्न संशोधकांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही पडला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात चालू मे महिन्यात रोज पाऊस पडणे वादळी वारे आणि विजाचे तांडव ही नवलाईची बाब राहिली नाहीये! दुपार पर्यंत कडक उन्ह, नंतर ढगाळ वातावरण, आणि संध्याकाळी, रात्री पडणारा रिमझिम वा दमदार पाऊस ही रोजची बाब ठरली आहे.

काल मंगळवारी, २७ मे रोजी देखील रात्री पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. मलकापूरचा अपवाद वगळता इतर १२ तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तीन तालुक्यात तर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सिंदखेड राजा ७१ मिमी, देऊळगाव राजा ६९ मिमी आणि जळगाव जामोद ६६. ८ मिमी या तालुक्यात कोसळधार पाऊस झाला असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संग्रामपूर ४६ मिमी चिखली ५५मिमी, बुलढाणा ४१, मेहकर ५५ मिमी, लोणार ५८, खामगाव ५५ मिमी, शेगाव ४१, नांदुरा ३० मिमी या तालुक्यातही जोरदार पाऊस झाला.

मे मध्येच पूर

पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अमरावती, अकोला, वाशिम सह बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे. मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या या नदी परिसरातील नागरिक आनंदित आहेत. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ असलेया पुलावर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे वृत्त आहे. मात्र मे महिन्यातच पूर आल्याने उन्हाळा की पावसाळा? असा मजेदार प्रश्नही निर्माण झाला आहे