नागपूर : मंगळवारी अकोला, पुसद येथे पोहचलेल्या मोसमी पावसाने आज बुधवारी आणखी प्रगती केली आहे. विदर्भातील आणखी काही भागांमध्ये तो पुढे सरकला आहे. बुधवारी चंद्रपूर, अमरावती, नवसारी, जळगाव येथे मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. केरळमध्ये मोसमी पावसाची अधिकृत घोषणा झाली की सर्वच ठिकाणी मोसमी पावसाच्या आगमनाची उत्सुकता लागलेली असते. कारण मोसमी पावसाच्या घोषणेनंतरच शेतकऱ्यांच्या शेतीचा हंगाम सुरू होतो. मात्र, अलीकडच्या काही वर्षात हवामान खात्याकडून मोसमी पावसाच्या घोषणेची केली जाणारी घाई शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरली आहे. तरीही शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आणि कान हवामान खात्याच्या मोसमी पावसाच्या घोषणेकडे लागले असतात. प्रामुख्याने विदर्भात हे चित्र दिसून येते.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला; नागपुरात स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात विदर्भवादी आक्रमक

यंदा मोसमी पाऊस वेळेच्या एक-दोन दिवस आधीच येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर याठिकाणी तो आल्यानंतर विदर्भात तो कधी येणार याचीच उत्सुकता होती. काल, मंगळवारी हवामान खात्याने पश्चिम विदर्भात मोसमी पावसाच्या आगमनाची घोषणा केली. अकोला, पुसद याठिकाणी तो आला आणि आज, बुधवारी हवामान खात्याने चंद्रपूर, अमरावती, नवसारी, जळगाव येथे मोसमी पाऊस पोहोचल्याचे सांगितले. विदर्भातील काही भाग तसेच महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी पुढे सरकला आहे. तर संपूर्ण तेलंगणा आणि छत्तीसगडच्या काही भागात तो आज पोहोचला. बिजापूर, सुकमा, मलकांगिरी, विझियांगरम, इस्लामपूरकडे मोसमी पावसाची वाटचाल आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान खात्याने काल विदर्भातील उर्वरित भागात मोसमी पाऊस सक्रीय होण्‍यास अजून अनुकूल स्थिती निर्माण झाली नसल्याचे सांगितले होते. विदर्भात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली, पण मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रीय झालेला नाही. तो अतिशय संथगतीने विदर्भाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याची गती मंदावली असल्याचे खात्यानेच स्पष्ट केले होते.

हेही वाचा : बुलढाण्यात वादळाचे तांडव; घरावरील टिनपत्रासह पाळणा उडाला, चिमुकलीचा करुण अंत

दरम्यान, हवामान खात्याने आज, बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर १४ ते १७ जून दरम्‍यान विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन-चार दिवसात मोसमी पाऊस विदर्भ व्यापणार असला तरीही २२ ते २५ जूनदरम्यानच पावसाची स्थिती चांगली राहील, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. गेले काही दिवस पूर्व विदर्भात तापमानात प्रचंड वाढ झालेली दिसून आली. ब्रम्हपूरी येथे चक्क ४५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर उपराजधानीत देखील तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. पूर्व विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळे बुधवारच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.