यवतमाळ : सरकारमधील नितेश राणेंसारखे भाजपचे काही मंत्री चिथावणीखोर वक्तव्य करून राज्यातील वातावरण कलुशीत करत आहेत. अशा मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, असा आरोप माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी येथे केला. महाराष्ट्रातील वातावरण कलुषित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिथावणीखोर मंत्र्यांना योग्य समज द्यावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.

अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर शहरात नेहमीच शांततापूर्ण वातावरण असते. तिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र नांदतात. दोन समाजात तेढ निर्माण होवून नागपुरात दंगल घडल्याची नोंद नाही. मात्र, सध्या काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण दूषित होत आहे. बजरंग दलासारख्या संघटनांनी औरंगजेबाची कबर काढण्याची धमकी दिली. त्यामुळे राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे, असे देशमुख म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याचे नागपूरमधील कोणत्या नेत्यांशी संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. राजकीय आश्रय असल्याने तो निर्धास्त असून, पोलीस संरक्षणात फरार झाला, असा आरोप त्यांनी केला. गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाचे प्रतिनिधीच गुंडांना संरक्षण देत असतील, तर अशा घटना वाढणारच, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तातडीने कशी सुधारेल, यासाठी गृहमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी बोलताना, विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी पक्षाने विदर्भ दौरा सुरू केला आहे, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला आलेल्या अपयशाबद्दल पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे विचारमंथन झाले. विदर्भ, मराठवाड्याचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक म्हणून माझ्यासह अनिल देशमुख यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली, असे डॉ. शिंगणे यांनी सांगितले. भविष्यात संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाईल, असे ते म्हणाले.

दिशा सालियान प्रकरणावर चुप्पी

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग याची सचिव दिशा सालियान हिचा मृत्यू हत्या असल्याचा आरोप होत आहे. तिच्या वडिलांनी या प्रकरणी फेर तपासणीची मागणी केली आहे. या प्रकरणात महाविकास आघाडीतील एका तरुण माजी मंत्र्याचे नाव असल्याचा आरोप होत आहे. मात्र या प्रकरणावर अनिल देशमुख यांनी उत्तर देण्याचे यावेळी टाळले.