नागपूर : राज्यात मागील वर्षीच्या (१ जानेवारी ते ७ मे २०२३) तुलनेत चालू वर्षात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, मृत्यू नियंत्रणात असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १ जानेवारी २०२३ ते ७ मे २०२३ दरम्यान डेंग्यूचे १५ हजार ३१२ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी १ हजार २३७ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. एकाचा मृत्यू झाला. चालू वर्षात १ जानेवारी २०२४ ते ७ मे २०२४ दरम्यान राज्यात १८ हजार ८३४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी १ हजार ७५५ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले, पण, एकही मृत्यू नाही.

हेही वाचा >>>मृत व्यक्ती, स्थलांतरितांची नावे मतदार यादीत, भाजपने दिले पुरावे

चालू वर्षात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण पालघर १७४, कोल्हापूर ११७, अकोला ७१, नांदेड ५८, सोलापुरात ५१ रुग्ण जिल्ह्यातील गैरमहापालिका क्षेत्रात आढळले. राज्यातील महापालिका क्षेत्रापैकी सर्वाधिक रुग्ण हे बृहन्मुंबई २८५ रुग्ण, नाशिक ७९, कोल्हापूर ४५, सांगली ४१, पनवेल ३८ या महापालिका हद्दीत नोंदवले गेले.

२०२३ मध्ये उन्हाळ्यानंतर रुग्णवाढ

राज्यात मागील वर्षी पहिल्या साडेचार महिन्यात डेंग्यूचे जास्त रुग्ण आढळले नाहीत. परंतु, सहा महिन्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याची नोंद आरोग्य विभागाच्या अहवालात आहे. २०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात राज्यात १९ हजार २९ रुग्ण आढळले. त्यापैकी ५५ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला.

हेही वाचा >>>धावत्या रेल्वेत पोलीस हवालदारांनी केला महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग

डेंग्यूची रुग्णसंख्या (गैरमहापालिका क्षेत्र)

(१ जानेवारी ते ७ मे दरम्यान कालावधी)

जिल्हा रुग्ण (२०२३) (रुग्ण २०२४)

पालघर             ११२             १७४

कोल्हापूर             ०६९             ११७

अकोला             ०२६             ०७१

नांदेड             ०३५             ०५८

सोलापूर             ०२९             ०५१

डेंग्यूची रुग्णसंख्या (महापालिका क्षेत्र)

(१ जानेवारी ते ७ मे दरम्यान कालावधी)

जिल्हा रुग्ण (२०२३) (रुग्ण २०२४)

बृहन्मुंबई ३३५             २८५

नाशिक             ०८८             ०७९

कोल्हापूर             ०३०             ०४५

सांगली             ०७२             ०४१

पनवेल             ०००             ०३८

अवेळी पावसामुळे यंदा डास वाढले व डेंग्यूचे रुग्णही वाढले. परंतु, प्रभावी उपायांमुळे मृत्यू नियंत्रणात यश मिळत आहे. घराजवळ कचरा होऊ न देणे, पाणी साचू न देणे असे उपाय केल्यास डेंग्यूवर नियंत्रण शक्य आहे. – डॉ. श्याम निमगडे, सहाय्यक संचालक (हिवताप), आरोग्य सेवा, नागपूर.