नागपूर : भारतीय जनता पक्षाने मतचोरीसाठी तंत्रज्ञानाचा पद्धतशीर वापर चालवला आहे. कर्नाटकमधील अलंद विधानसभेत मतदार गायब करण्याचा प्रकार झाला आहे. ही मतचोरी सापडली आहे, परंतु मतचोर सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे, अशी माहिती अलंदचे आमदार व कर्नाटक राज्य धोरण व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बी.आर. पाटील यांनी शुक्रवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, कर्नाटक सरकारने माझ्या विधानसभेत झालेल्या मतचोरी प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. पण एसआयटीने मागवलेली माहिती अजूनही निवडणूक आयोगाने दिलेली नाही. माहितीच दिली जात नसेल तर एसआयटी तपास पुढे जाऊ शकणार नाही. यापूर्वी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे होता. सीआयडीने आयोगाला १८ महिन्यांत १८ पत्रे पाठवली. तरीही आयोगाने आयपी ॲड्रेस, डिव्हाइस पोर्ट आणि ओटीपी ट्रेल्सची माहिती दिली गेलेली नाही. मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभर मांडलेल्या ‘मतांची चोरी’ प्रकरणातील साक्षीदार आहे. मतांची चोरी झाली आहे, पण चोर अजूनही सापडलेला नाही, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे उपस्थित होते.
६००० मतदार हटवण्याचा कट
२०२३ मधील कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. माझ्या आलंद मतदारसंघात सुमारे ६००० मतदार हटवण्याचा प्रयत्न झाला. यासाठी बनावट अर्ज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन भरले गेले, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाकडून पोलीस तक्रार
काँग्रेस उमेदवार म्हणून मतचोरी उघडकीस आणली. त्यानंतर या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीने पोलीस तक्रार दाखल केली. आयोगाने स्वतः हे लक्षात आणले नाही. एखाद्याने मत वगळण्यासाठी १४ मिनिटात १२ अर्ज भरले, ही गोष्ट आयोगाला कळायला हवी होती, असेही पाटील म्हणाले.
काँग्रेससमोर दोन पर्यांय
याप्रकरणी न्यायासाठी आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुचवले आहे. अशाप्रकारे पद्धतशीरपणे मतचोरी होत असल्याने लोकशाहीचा गळा आवळला जात आहे. आणि मतदारांची फसवणूक होत आहे. या प्रकरणात दोन वर्षांहून काही घडलेले नाही. मतचोर कोण आहे, असे अद्याप पुढे आलेले नाही, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.