नागपूर: मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे चार दिवसांपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील मराठा बांधव मुंबईमध्ये आले आहेत. आझाद मैदान परिसरात हे आंदोलन सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर मराठा बांधवांना थांबून आहेत. यामुळे तेथील परिस्थितीवर कसा परिणाम होत आहे याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी रविवारी नागपूर येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

राज्यमंत्री पंकज भोईर म्हणाले की, मुंबईमध्ये मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून तेथील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याशिवाय मोठ्या लोकसंख्येचेही हे शहर आहे. त्यामुळे ट्राफिक जामसह अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. आमच्या आई भगिनी मुंबई लोकलने प्रवास करतात मात्र रेल्वे स्थानक आणि इतर भागात झालेल्या गर्दीमुळे त्यांना ये – जा करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंदोलनामुळे कोणालाही कुठलाही परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

फडणवीसांनीच ओबीसी आणि मराठा समाजाला न्याय दिला

महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालय तयार करण्याचे काम सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ओबीसी विद्यार्थ्यांचा वसतिगृहाचा आणि इतरही प्रश्न सोडवण्याचे काम तसेच मराठा समाजाला आरक्षण देणारेही फडणवीस होते. मधल्या काळात उद्धव ठाकरे सरकारमुळे मराठ्यांचे आरक्षण गेले. मात्र, त्यानंतरही परत आमच्याच सरकारने आरक्षण दिले. आताही ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लागत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीस कटिबद्ध असून सर्व ओबीसी आमदार त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केला.

जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईमधील दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला आहे. सरकार आंदोलनावर पूर्ण लक्ष ठेवून आहे. या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची नावे योग्य वेळी जाहीर केली जातील. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध मार्गातून जरांगे यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहेत. आंदोलन थांबवण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, जरांगे कायम मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत असतात. ही बाब योग्य नाही. उलट फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. सारथी आणि विविध योजनांच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांच्या हाताला रोजगार दिला. त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली. दुसरीकडे ओबीसी समाजासाठीही त्यांनी काम केले. आजही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे सरकार ओबीसींच्या पाठीशी आहेत, असेही भोयर म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी खासदार रामदास तडस, सुनील मेंढे, आमदार कृष्णा खोडपे, आमदार प्रवीण दटके, आमदार समीर मेघे आदींची उपस्थिती होती.