नागपूर : राज्य सरकारने ओबीसी समाजाला चर्चेचे निमंत्रण दिले, परंतु त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी २९ सप्टेंबर २०२३ रोजी ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा करण्यासंदर्भात बैठक बोलावली आहे. राज्य सरकारने बैठकीचे निमंत्रण दिले. त्यामध्ये भाजपचे आमदार, पदाधिकारी अधिक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने बहिष्कार करण्याचा निर्णय आज घेतला. राज्य सरकारने या बैठकीला कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊ नये किंवा या आंदोलनात सक्रिय सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना बोलावावे. त्याशिवाय बैठकीत समतोल चर्चा आणि तोडगा निघणे अशक्य होईल, असे सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील म्हटले आहे. सर्व शाखीय कुणबी समाजाची आज बैठक झाली. त्यामध्ये बैठकीत सर्व पक्षीय नेते असू द्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलावू नका. अन्यथा आम्ही बैठकीला सहभागी होणार नाही, असा ठराव घेण्यात आला.

हेही वाचा >>> चीन, सिंगापूरसह इतर देशांच्या तुलनेत भारतात मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण कमी, पण…

यापूर्वी म्हणजे २६ सप्टेंबर २०२३ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (वित्त). उपमुख्यमंत्री (गृह) आणि इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन २९ सप्टेंबर २०२३ ला महाराष्ट्र शासनामार्फत आयोजित बैठकीकरिता निमंत्रितांच्या यादीवर आक्षेप नोंदविला होता. तसेच या निमंत्रितांच्या यादीमध्ये सुधारणा करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु ही विनंती महाराष्ट्र शासनामार्फत मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीची बैठक बोलावण्यात आली. यात २९ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनामार्फत ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जी बैठक बोलण्यात आलेली आहे. ती सर्वसमावेशक नसल्याने तसेच सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीची मागणी मान्य न केल्यामुळे त्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला. राज्य सरकारने सर्वसमावेशक अशी बैठक बोलावून चर्चेचे निमंत्रण दिल्यास सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समिती उपस्थित राहतील, असेही कृती समितीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे प्रतीक; तब्बल बारा वर्षांपासून मुस्लिम बांधावाकडून होते बाप्पाचे विसर्जन !

राष्ट्रीय ओबसी महासंघाची बैठकीला जाणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज १८ व्या दिवशीही संविधान चौकात साखळी उपोषण केले. त्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते. २९ सप्टेंबरला मुंबई मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रित सहभागी होणार आहेत, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunbi obc movement action committee boycotted meeting of maharashtra government rbt 74 zws