वाशिम : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…चा जय घोष करीत ढोल ताशांच्या गजरात आणि डिजेच्या निनादात लाडक्या बाप्पाला आज अखेरचा निरोप दिला जात आहे. वाशीम शहरात देखील बाप्पाला अखेरचा निरोप दिला जात आहे. मात्र, शहरातील देव तलाव येथे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन होत असून तब्बल बारा वर्षांपासून मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणरायाचे विसर्जन केले जात आहे.
हेही वाचा >>> निरीक्षण मनोरे, ड्रोन व सीसीटीव्ही आणि कडक बंदोबस्त; गणेश विसर्जनावर पोलिसांची करडी नजर
गेल्या नऊ दिवसापासून मनोभावे बाप्पाचे पूजन केल्यानंतर आज जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला जात आहे. वाशीम शहरातील घरा घरात मांडण्यात आलेले व काही सार्वजनिक गणेश मंडळातील श्री चे विसर्जन देव तलावात केले जाते. वाजत गाजत आलेल्या बाप्पाचे देव तलावात मागील बारा वर्षांपासून मुस्लिम बांधवांच्या हस्ते विसर्जन केले जात असून ही परंपरा आजही कायम आहे. आज ईद ए मिलाद असतानाही दिवसभर बाप्पाचे विसर्जन ते करतात हे विशेष आहे.