नागपूर : महावितरणकडून राज्यातील वीज ग्राहकांकडे सक्तीने ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ लावले जात आहे. परंतु, यंदाच्या गणेशोत्सवात राज्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या जोडणीसाठी मात्र साधे मीटर लावले गेल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे महावितरणच्या कामावर स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध करणाऱ्या वीज कामगारांच्या संघटना आश्चर्य व्यक्त करत आहे.
राज्यात २ कोटी २४ लाख ८८ हजार ८६६ गैरकृषी वीज ग्राहक आहे. त्यांच्या मीटरला ‘स्मार्ट मीटर’मध्ये बदलवले जाणार आहे. या मीटरला अनेक ग्राहक संघटनांचा विरोध आहे. विदर्भ ग्राहक संघटनेकडून या मीटरविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली गेली आहे. सुरुवातीला महावितरणचे अधिकारी या मीटरबाबत बोलणे टाळत होते. परंतु, त्यानंतर या मीटरचे नाव टी.ओ.डी. मीटर करून बदलणे सुरू झाले.
मात्र, यंदाच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी मागितलेल्या तात्पुरत्या जोडणीत निवडक मंडळ सोडले तर बहुतांश ग्राहकांकडे ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ लावताना काढलेले जुने मीटरच लावले गेले आहे. या वृत्ताला राज्यातील काही जिल्ह्यांतील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला. महावितरच्या मुख्य आणि इतर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे म्हणणे काय ?
ग्राहकांकडे टी.ओ.डी. मीटरच्या नावावर ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ लावले जात आहे. अनेकांचा नकार असूनही त्याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मात्र साधे मीटर लावले गेले आहे. ग्राहकांनाही साधे मीटर लावण्याचा विकल्प द्यायला हवा, असे मत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष मोहन शर्मा यांनी व्यक्त केले.
विदर्भ ग्राहक संघटनेचे म्हणने काय?
विदर्भ वीज ग्राहक संघटनेने नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेत असे म्हटले आहे की, स्मार्ट मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय बसविले जात आहेत, तसेच या मीटरसाठी आवश्यक तांत्रिक व आर्थिक अभ्यास न करता सरकारने जबरदस्तीने अंमलबजावणी केली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारने याप्रकरणात उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करत स्मार्ट मीटर बसविण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
प्रीपेड मीटर राहणार?
राज्यात २ कोटी २४ लाख ८८ हजार ८६६ गैरकृषी वीज ग्राहक आहेत. त्यांच्या मीटरला स्मार्ट मीटरमध्ये बदलवले जाणार आहे. आतापर्यंत ३८ लाखाहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.