नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरी मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता राज्यात विरोधी पक्षांची मोट या मुद्यांवर बांधली गेली आहे. आज मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आघाडीतील इतर नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयोगाला या मुद्यांवरून काही प्रश्न विचारले आहे. तर इकडे नागपूर जिल्ह्यात मतचोरी प्रकरण समोर येत आहेत.

डिगडोह देवी नगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या १२ प्रभागांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि घोळ आहे, असा आराेप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे उमेश सिंग राजपूत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.राजपूत म्हणाले, अनेक नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागांमध्ये टाकण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबांची नावे एकाचवेळी अन्य प्रभागात स्थलांतरित झालेली दिसत आहेत.

यामुळे मतदार याद्यांची विश्वासार्हता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन झाले की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राजपूत यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात मतदार याद्यांची पुनर्पडताळणी, स्थलांतरांची चौकशी, घराघरांचे पुनः सर्वेक्षण, सर्व आदेश सार्वजनिक करणे आणि आक्षेपांचे पारदर्शक निवारण अशा पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.मतदार यादी लोकशाही प्रक्रियेचा पाया असून, त्यातच गोंधळ असल्यास जनतेचा विश्वास डळमळीत होतो, असे मत राजपूत यांनी व्यक्त केले.

हिंगण्यात एकाच पत्त्यावर दोनशे मतदारविविध विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदारांची प्रकरणे समोर येत असतानाच आता नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातही मोठा घोळ उघड झाला आहे. प्रारूप मतदार यादीत बोगस नावे, अवास्तव नोंदी आणि संशयास्पद पत्त्यांनी खळबळ उडाली आहे.हिंगणा विधानसभा मतदारसंघातील वानाडोंगरी येथील राजीव नगर प्रभाग क्रमांक ५ मध्ये घर क्रमांक १ मध्ये तब्बल २०० पेक्षा अधिक मतदार राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या प्रभागातील झोपडपट्टी भागाच्या यादीत विदर्भातील नामवंत व सत्ताधारी वर्गाशी संबंधित मेघे कुटुंबांच्या तब्बल २७ सदस्यांची नावे असल्याचे उघड झाले आहे. काही विद्यार्थ्यांची नावे वसतिगृहाच्या पत्त्यावर मतदार म्हणून नोंदवण्यात आली आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते दिनेश बंग यांनी तातडीने चौकशी व सर्वेक्षण मोहीम राबवण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. देशातील व राज्यातील सरकार बोगस मतांवरच निवडून आले आहे. त्यामुळे सरकारकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.

मात्र, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोगावर जो कलंक लागला आहे, तो सायचा असेल, तर राज्य निवडणूक आयोगाने व जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून घरोघरी तपासणी मोहीम राबवावी आणि बोगस मतदारांची नावे त्वरित वगळावीत. अन्यथा, आगामी निवडणुकांमध्ये ‘लोकशाहीचा सर्रास खून होईल,’ अशी तीव्र प्रतिक्रिया दिनेश बंग यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी कामठी विधानसभा मतदारसंघात मतचोरी उघडकीस आली होती. आरोप हास्यास्पदबोगस मतनोंदणीचे आरोप हास्यास्पद व बिनबुडाचे आहेत. मेघे कुटुंबातील २७ जण त्या परिसरात २५ ते ३० वर्षांपासून राहतात.- समीर मेघे, भाजप आमदार.