नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या १०० व्या स्थापना वर्षाच्या समारंभासाठी पाकिस्तान, तुर्की आणि बांगलादेशच्या दूतावासांना निमंत्रण पाठवणार नाही, तर इतर देशांच्या राजकीय दुतावासांना निमंत्रित केले जाणार, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी समाजातील विविध घटक, अल्पसंख्याक समुदाय, क्रीडा आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वे, विचारवंत, स्टार्टअप्स आणि भारतीय ज्ञान प्रणालीशी संबंधित उद्योजकांना आमंत्रित करण्याची संस्थेची योजना आहे.

या उत्सवाचे मुख्य आकर्षण २६ ऑगस्टपासून दिल्लीत सुरू होणारा तीन दिवसांचा संवाद असेल. ज्यामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संघाचा १०० वर्षांचा प्रवास, राष्ट्र उभारणीतील त्याची भूमिका आणि भविष्यातील दृष्टिकोन यावर चर्चा करतील. यासाठी मुस्लीम धर्मसह अन्य धर्मगुरूंनाही बोलावले जाणार आहे. मात्र, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशाच्या राजदुतांना निमंत्रण देणार नाही.

दिल्लीत तीन दिवसांचा संवाद

संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने चार प्रमुख कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी पहिला कार्यक्रम २६ ऑगस्टपासून दिल्लीत सुरू होईल. या तीन दिवसांच्या कार्यक्रमात, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत दररोज संध्याकाळी ५:३० वाजता व्याख्यान देतील. पहिले दोन दिवस त्यांचे व्याख्याने असतील, तर तिसरा दिवस आगाऊ सादर केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी राहणार आहे. संवादामध्ये ‘पंच परिवर्तन’ या संघाच्या अजेंड्यावर आधारित राहणार आहे.

इतर शहरांमध्येही कार्यक्रम

दिल्लीनंतर बेंगळुरू (नोव्हेंबर), कोलकाता आणि मुंबई येथे असेच संवाद आयोजित केले जातील. प्रत्येक कार्यक्रमात मोहन भागवत यांचे दोन दिवस व्याख्याने असतील आणि तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तर सत्र असेल. हे कार्यक्रम २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शताब्दी समारंभापर्यंत सुरू राहतील असे आंबेकर यांनी सांगितले. संघाने या कार्यक्रमात समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश करण्याची योजना आखली आहे.

सुनील आंबेकर यांच्या मते, निमंत्रण यादीमध्ये १७ मुख्य श्रेणी आणि १३८ उप-श्रेणींचा समावेश आहे. ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, आध्यात्मिक, क्रीडा, कला, माध्यम आणि बौद्धिक क्षेत्रातील नेते समाविष्ट आहेत. त्यात तरुण नवोन्मेषक, तंत्रज्ञान तज्ञ, भाषा प्रवर्तक आणि उद्योजकांचा देखील समावेश आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून या वर्षात संघाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी संघ वर्षभरापासून तयारी करीत आहे.