नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय समीकरणात बदल होऊ लागले आहेत. वॉर्ड आरक्षित झाल्याने अनेक दिग्गज नगरसेवक, माजी महापौर यांना त्यांच्या पारंपरिक प्रभागांतून लढता येणार नसल्याने त्यांनी आता नव्या वॉर्डाचा शोध सुरू केला आहे. महिलांसाठी वॉर्ड राखीव झालेल्यांनी पत्नीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत तर काहींनी सुरक्षित वॉर्डाचा पर्याय ठेवला आहे.
आरक्षणाने पारंपरिक राजकीय समीकरणांना छेद दिला आहे. अनेक दिग्गजांची “वॉर्ड शोध मोहीम” सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत या बदलांचा उमेदवार निवडीवर आणि पक्षांच्या योजनेवर मोठा परिणाम होणार आहे. एकूण १५१ जागांपैकी ७६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे चार सदस्यांच्या प्रत्येक प्रभागात किमान दोन महिला उमेदवार अनिवार्य असतील. परिणामी अनेक वरिष्ठ नगरसेवकांना आपल्या पारंपरिक क्षेत्राबाहेर जाण्याची वेळ आली आहे.
आरक्षणाचा भाजप, काँग्रेस आणि बसपातील अनेक नेत्यांना धक्का बसला. २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना असली, तरी आरक्षण बदलामुळे अनेक दिग्गजांची पंचाईत झाली आहे. भाजपच्या माजी महापौर नंदा जिचकार आणि माया इवनाते, काँग्रेसचे प्रफुल गुडधे, तसेच बसपचे जितेंद्र घोडेस्वार यांना त्यांच्या विद्यमान प्रभागांतून निवडणूक लढवता येणार नाही. प्रभाग क्रमांक ६ मध्ये अनुसूचित जमाती (महिला), ओबीसी, सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण असे आरक्षण आहे. घोडेस्वार यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव आहे.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये चारपैकी दोन जागा अनुसूचित जाती (महिला) आणि ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. एक जागा अनु. जमाती व एक सर्वसाधण गटासाठी आहे. माजी महापौर माया इवनाते येथून निवडून आल्या होत्या. त्यांना पुन्हा संधी द्यायची असेल तर भाजपला या ठिकाणी तीन महिला उमेदवार द्यावे लागतील. अशीच स्थिती प्रभाग क्रमांक १४ मध्ये आहे. येथे अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांसाठी दोन जागा असल्याने भाजपच्या प्रगती पाटील यांना तेथे संधी दिसत नाही.
प्रभाग क्रमांक ३७ मध्ये नंदा जिचकार यांचा प्रभागही आरक्षणामुळे बदलला, येथे अनुसूचित जाती आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत. भाजप त्यांना खुल्या प्रवर्गातून संधी देते का हे बघावे लागेल.
प्रभाग क्रमांक १९ (अ) ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने ॲड. संजय बालपांडे यांचीही अडचण झाली आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३४ मध्ये ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण ठरल्याने २०१७ मधील दोन विद्यमान महिला नगरसेविका अनुक्रमे माधुरी ठाकरे आणि मंगला खेकरे यांच्यापैकी एकीलाच भाजपला संधी देता येणार आहे.
प्रभाग क्रमांक ३८ मध्ये तीन सदस्य असून, त्यात एक अनुसूचित जमाती, एक ओबीसी महिला आणि एक सर्वसाधारण महिला असे आरक्षण ठरले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांना यावेळी लढता येणार नाही. अनेक वर्षानंतर प्रथमच या प्रभागात गुडधे कुटुंबातील पुरुष उमेदवारला संधी मिळणार नाही.
