नागपूर : आई वडीलांपासून ताटातूट झालेली, घरातून निघून गेलेली, हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना पुन्हा त्यांच्या आई-वडील, घर मिळावे यासाठी रेल्वे सुरक्षा दलातर्फे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबवली जाते आहे. यासाठी आरपीएफ सतर्क असतात. त्यांची नजर सातत्याने रे्लवे स्थानकावरील बेवारस, संशायस्पद स्थितीत आढळणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींकडे असते. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुला-मुलींचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचले आहे.

मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकावरून उत्तर, दक्षिण आणि पूर्व -पश्चिम भारताकडे गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. लाखो प्रवासी दररोज नागपुरातून ये-जा करतात. त्यामुळे साहजिकच या स्थानकावर कडक पाहऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. स्थानकाची मुख्य इमारत जागतिक वारसा स्थळ आहे. या इमारतीला सोडून सर्व कामे सुरू आहेत.

आसाम, ओरिसा आणि पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार, छत्तीसगड येथून मोठ्या प्रमाणात प्रवास नागपूरमार्गे मुंबई, पुण्याला जातात किंवा नागपुरात उतरतात. यात अनेकदा अल्पवयीन मुले-मुली देखील असतात. गेल्या आठवड्यात छत्तीसगडच्या दुर्गमधून पाच अल्पवयीन संशयास्पद स्थितीत आढळल्या होत्या. त्यांना नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने पकड लेता व त्यांना बाल सुधार गृहात पाठवून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले होते.

आता नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ड्युटीवर असलेले प्रधान आरक्षक अंबोरे व आरक्षक नरेंद्र नेहरा यांनी एक अल्पवयीन मुलगी आणि एक युवक संशयास्पद अवस्थेत पाहिले. तत्काळ कृती करत त्यांनी दोघांची चौकशी केली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे दोघांनाही आरपीएफ पोलीस ठाणे, नागपूर येथे आणण्यात आले. आरपीएफ ठाण्यात एएसआय झुमा इंगले, चाईल्ड लाइन प्रतिनिधी आणि महिला आरक्षक यांच्या उपस्थितीत सहानुभूतीपूर्वक चौकशी करण्यात आली. चौकशीत समोर आले की, दोघेही पालकांना न सांगता घरातून निघाले होते आणि नागपूर येथे आले होते.

मुलीच्या सुरक्षेस प्राधान्य देत तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर, चाईल्ड लाईन प्रतिनिधी व महिला कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली तिला शासकीय बालिका गृह, काटोल रोड, नागपूर येथे सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आले. मध्य रेल्वे नागपूर मंडळातील रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कता व संवेदनशीलतामुळे एका अल्पवयीन मुलीचे योग्य वेळी संरक्षण सुनिश्चित करता आले. नागपूर मंडळ नेहमी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे.