अकोला : विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान ‘प्रती माहूर’ म्हणून ओळखले जाणारे पातुरचे रेणुकामाता मंदिर जागृत देवास्थान आहे.गडावरील श्री रेणुकामातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव सुरू असून पंचक्रोशीसह विदर्भातून हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. रेणुका मातेच्या मंदिरासमोरच्या डोंगरात लेण्या आणि भुयार आहेत. ते समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. पूर्वी याठिकाणी किल्ला देखील होता. पातूर येथील रेणुका माता ही माहूरच्या रेणुकामातेचे प्रतिरूप मानले जाते. अकोला शहरापासून ३० कि.मी. अंतरावर येते. नवरात्राेत्वासह वर्षभर रेणुकामातेच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी असते. पातूर येथील मंदिर अनेक वर्षांपूर्वी बांधलेले आहे.

या ठिकाणी श्रीकृष्ण, राम-सीता-लक्ष्मण आणि दत्तात्रयाच्या तीन मंदिरांचे बांधकाम करण्यात आले. गेल्या काही वर्षांत भक्तांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या मंदिराला आधी पायऱ्या नव्हत्या. त्यानंतर दगडांच्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. आता या मंदिराला २५६ पक्क्या पायऱ्या आहेत. गड चढून भाविक मोठ्या श्रद्धेने रेणुकामातेपुढे नतमस्तक होत असतात.

निसर्गरम्य टेकडीवर वसलेले रेणुकामातेचे प्राचीन मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त भक्तांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. गडावर चढतांना मार्गात हनुमान व गणपती मंदिर, तसेच स्व. दीनानाथ महाराज यांची समाधी आहे. गडावरील स्वच्छता व शांततेमुळे भाविकांना अलौकिक शांतीचा अनुभव मिळतो. नवरात्रोत्सवानिमित्त सध्या सकाळी ६.३० व संध्याकाळी ६ वाजता रेणुकामातेच्या आरतीला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ, महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून भाविक दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत.

गडावर भाविकांच्या सुविधेसाठी विकास कार्य

पातूर येथील रेणुकामाता मंदिराच्या गडावर भाविकांच्या सुविधेसाठी विविध विकास कार्य करण्यात आले आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या चार कोटी ७५ लाखांच्या निधीतून गडावर बांधकाम सुरू आहे. देणगीदार व भक्तांच्या मदतीने मंदिरात पाणी, प्रसाधनगृहे, पाळणे व बसण्याची व्यवस्था करण्यात आली. गत वर्षी गाभाऱ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा झाली आहे.

नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

नवरात्रोत्सवानिमित्त पातूर येथील रेणुकामातेच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. गडावरील धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमांमध्ये भाविक हजारोंच्या संख्येने सहभागी होत आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त पातूर येथील रेणुका मातेच्या गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.