अकोला: उत्तर व दक्षिण भारताला जोडणारी एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी दरम्यान नवीन रेल्वे सेवेचा प्रारंभ ५ मेपासून होईल. उन्हाळ्यातील गर्दीच्या काळात रेल्वे प्रवाशांना या गाडीचा मोठा लाभ होणार आहे.
उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्ट्या लागत असल्याने बाहेर गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. सोबतच या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये लग्नसराई देखील असते. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी दिसून येते. अनेक महिने अगोदरच रेल्वेचे आरक्षण देखील फुल्ल होऊन जाते. या गर्दीच्या काळात प्रवाशांचे प्रचंड गैरसोय होते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गाडी क्रमांक २०६२५ चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी एक्सप्रेस सोमवार, ५ मेपासून आठवड्यातून पाच दिवस बुधवार आणि शनिवार वगळता चेन्नई सेंट्रल येथून १९.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२.१५ वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक २०६२६ भगत की कोठी – चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस बुधवार, ०७ मेपासून आठवड्यातून पाच दिवस शनिवार आणि मंगळवार वगळता भगत की कोठी येथून ५.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.१५ वाजता चेन्नई सेंट्रल येथे पोहोचणार आहे.
या गाडीला सुल्लुरुपेटा, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, विजयवाडा, खम्मम, वारंगल, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, अंकलेश्वर, वडोदरा, आनंद, साबरमती, मेहसाणा, पाटण, भीलडी, राणिवाडा, मारवाड भीनमाळ, मोडरान, जालोर, मोकलसर, समडडी, लूणी येथे थांबा राहणार आहे. दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे. तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
पर्यटनासाठी सोईस्कर
दक्षिण व उत्तर भारताला थेट जोडणारे चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी एक्सप्रेस पर्यटनासाठी सोयीस्कर ठरणार आहे. या रेल्वेगाडीच्या माध्यमातून अनेक तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळे जोडली जाणार आहेत. पर्यटकांना त्याचा लाभ घेता येईल.