नागपूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अनेक पालकांनी जर आरटीईसाठी अद्यापही अर्ज केला नसेल तर त्यांनाही संधी आहे. नागपूर जिल्ह्यातील आरटीई प्रवेशाची काय स्थिती आहे ती बघुया.नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ९५४ अर्ज आले आहेत. मुलांचे अर्ज भरण्यासाठी आता २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीचे शिक्षण मोफत दिले जाते. या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून शाळांना करण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळा नोंदणीसाठी ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले होते. परंतु, यंदा ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला लवकर सुरुवात झाल्याने मुलांच्या प्रवेशासाठी पालकांचे मोठ्या प्रमाणात अर्ज येत असल्याचे चित्र आहे. प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीसाठी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. . ‘आरटीई पोर्टल’वरील आकडेवारीनुसार, राज्यात ८ हजार ८५८ शाळांची नोंद झाली असून १ लाख ९ हजार ३९ जागा उपलब्ध आहेत. नागपुरात यंदा प्रवेशासाठी ६४६ शाळांची नोंदणी झाली असून त्यात प्रवेशासाठी ७ हजार ५ जागा उपलब्ध आहे. या जागांसाठी आतापर्यंत २५ हजार ९५४ पालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. अर्ज करण्यास २७ जानेवारीपर्यंत मुदत होती. परंतु यात वाढ करून आता २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज येणार आहेत. त्यामुळे अर्जांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून आले इतके अर्ज
यंदा राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध झाल्या आहेत. आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार सोमवारी सायंकाळपर्यंत २ लाख ५२ हजार ८९१ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. त्यात सर्वाधिक ५२ हजार ८०५ अर्ज पुणे जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल नागपूर जिल्ह्यातून २५ हजार ८०४, ठाणे जिल्ह्यातून २१ हजार ९१६, नाशिक जिल्ह्यातून १४ हजार ६३७, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १३ हजार ४९३ अर्ज दाखल झाल्याचे दिसून येत आहे.
© The Indian Express (P) Ltd