नागपूर : वाढत्या मानव तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून शनिवारी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. देशात प्रथमच यासाठी जिल्हा कृती गटाची पोलीस आयुक्तांनी स्थापना केली. जिल्हा पातळीवरील हा गट मानवी तस्करीची उच्च जोखीम असलेल्या ३३० हॉटस्पॉट्सवर वॉच ठेवणार आहे. त्यासाठी दोन प्रकारच्या मानक कार्यप्रणाली (एस. ओ. पी) तयार करण्यात आल्या. सोबतच मध्यवर्ती रेल्वे आणि बस स्थानकावर ऑपरेशन शक्तीचे मदत कक्ष सेवेत दाखल करण्यात आला. हे दोन्ही मदत कक्ष २४ तास खुले राहणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी शनिवारी येथे दिली.
ऑपरेशन शक्ती या तिसऱ्या मिशनची माहिती देताना पत्रकारांशी साधलेल्या संवादात पोलीस आयुक्त सिंगल म्हणाले, गेल्या काही महिन्यांत पोलीस आयुक्तालयाने २४ प्रकरणांत मानवी तस्करीचे गुन्हे दाखल करीत ८ अल्पवयीन मुलींसह ४२ महिलांची सुटका केली तर ४४ मानव तस्करांना अटक केली. संभाव्य हॉटस्पॉट्सचे मॅपिंग, संशयितांचे प्रोफाइलिंग, गुप्त माहिती आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे हे शक्य झाले. शहरातील उच्च-जोखमीच्या भागांमध्ये बसवलेल्या २२ फेशियल रेकग्निशन कॅमेरांमधून मानवी तस्करीवर वॉच ठेवला जाईल. ३३ पोलीस ठाण्यांमध्ये मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
या विभागांची घेणार मदत
या कार्यगटात पोलीस विभागासोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बालविकास विभाग, रेल्वे सुरक्षा दल , रेल्वे पोलीस, महापालिका, महाराष्ट्र पर्यटन आणि परिवहन विभाग, बाल कल्याण समिती, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. ही समिती तस्करी रोखण्यासाठी एकत्र काम करेल. दामिनी पथकाचे शिघ्र कृती दलाला देखील अलर्ट करण्यात आले असून त्यांचीही मदत मागितली जाईल.
या आहेत दोन एसओपी
पहिल्या मानक कार्यप्रणालीतून डिजिटल क्राईम व्यवस्थापन, डिजिटल पुरावे संकलन, कायदेशीर मदत यावर भर दिला जाईल. दुसऱ्या मानक कार्यप्रणातील खाजगी व व्यावसायिक मालमत्तांमध्ये देहव्यवसाय प्रतिबंध व प्रतिसादासाठी, जी लॉज, हॉटेल्स, आणि मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्यांना कायद्यानुसार जबाबदारी निश्चित केली जाईल.
पहिल्या कार्यशाळेत पोलीसांना प्रशिक्षण
जिल्हा कृती गट अंतर्गत सुरू झालेल्या ऑपरेशन शक्तीची पहिली कार्यशाळा पोलीस आयुक्तालयात घेण्यात आली. यावेळी मिशन वात्सल्य, बचपन बचाओ आंदोलन, मुले जबरदस्तीने कामावर लावली जातात, लैंगिक शोषण, अवयव विक्री, बालविवाहासारख्या मानवीवर मंथन झाले. कार्यशाळेत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, डॉ. शिवाजी राठोड, राजेंद्र दाभाडे, केरळ येथून आलेले मानवी तस्कर विरोधी मोहिमचे तज्ज्ञ आणि सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डॉ. पी. एम. नायर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., पोलीस उपायुक्त महक स्वामी, लोहित मतानी, निकेतन कदम, रश्मिता राव, नित्यानंद झा, ऋषिकेश रेड्डी, राहुल मदने, राहुल मागणीकर, डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होते.
केवळ तस्करी रोखण्यासाठी हे अभियान नाही तर यातून बळी पडलेली पीडित मुले आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी व्यापक काम होईल. मानवी तस्करी रोखण्यासाठी लॉज, स्पा, हॉटेल्स व सार्वजनिक ठिकाणी कायद्याची जाणीव करून देणारे आणि पीडितांना मदत मागता यावी, असे फलक बंधनकारक असतील. – रविंद्र सिंगल, पोलिस आयुक्त, नागपूर.
मानवी तस्करी हा जघन्य अपराध आहे. तो गंभीर स्वरुपाचा व्यापारच आहे. महिला आणि मुलांची विक्री करण्यासाठी त्याचा वापर होतो. गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे. ऑपरेशन शक्ती ही मोहिम एकादिवसापुरती मर्यादित नाही. ती सातत्यपूर्ण, माहितीवर आधारित असावी. – डॉ. पी. एम. नायर, पोलीस महासंचालक (सेवानिवृत्त).