नागपूर: विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मित्रपक्षांचा दणदणीत विजय झाला. या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचेही योगदान मोठे असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. या  योजनेची माहिती देणाऱ्या रांगोळीचे काम नागपुरातील दोन कार्यालयात सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे. या योजनेला महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे समजले जाते. या योजनेवर आधारित महारांगोळी येथील सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारली जात आहे. विधान भवनाच्या पोर्चमध्येही याचीच एक प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्यामुळे रांगोळीच्या माध्यमातून नागपुरात पुन्हा या योजनेकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रीत होणार आहे.

हेही वाचा >>> अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवादी आक्रमक होणार… 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मुख्यमंत्री सचिवालय परिसरात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांची कार्यालये उभारण्यात आली आहेत. याच परिसरात मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागील भागात १२ सेमी उंचीच्या डायसवर १२ बाय २४ फुट आकाराची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आधारीत रांगोळी साकारण्यात येत आहे. लाडक्या बहिणीची प्रातिनिधिक प्रतिकृती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकृती रेखाटण्यात येत असून खास शैलीतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही खास शब्द रचनाही रेखाटण्यात येत आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ शहरातील आर्णी मार्गाच्या बांधकामात त्रुटी; न्यायालयाकदून प्रधान सचिवांसह ११ जणांना…

उद्या रांगोळी तयार होणार

सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी उपअभियंते आणि गेल्या ४५ वर्षांपासून रांगोळी कलाकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सुनिल तरारे यांच्या नेतृत्वात नागपूर व यवतमाळ येथील एकूण पाच कलाकार ही महारांगोळी साकारत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सलग १३ तास  हे कलाकार या रांगोळीचे आरेखन आणि रंगसंगतीचे कार्य करीत आहेत. १५ डिसेंबर पर्यंत ही रांगोळी तयार होणार आहे. याठिकाणी कार्यालयीन व परिसर स्वच्छतेत मग्न असणाऱ्या महिला कामगार  उसंत मिळताच या रांगोळीचे अवलोकन करुन  सेल्फी घेत असल्याचे उत्साही चित्र दिसून येत आहे. सेल्फी काढणे सोयीचे व्हावे यासाठी रांगोळी शेजारी दीड फुट उंचीचा डायस उभारण्यात आला आहे. विधानभवनाच्या मुख्य पोर्च मध्येही हाच कालाकारांचा चमू ४ बाय ६ फुट आकारातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वर आधारित रांगोळी साकारणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rangoli work for mukhyamantri majhi ladki bahin yojana in vidhan bhavan in nagpur mnb 82 zws