लोकसत्ता टीम

चंद्रपूर : खासदार नवनीत राणा यांनी स्वत:प्रमाणे मलाही बोगस जात प्रमाणपत्र मिळवून द्यावे, त्यानंतर मी अमरावती लोकसभा मतदार संघातून त्यांच्या विरुध्द निवडणूक लढण्यास तयार आहे, अशी खोचक टीका एआयएमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी केली. भ्रष्टाचाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा किंवा कारागृहात जावे, या प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकारण वाईट पातळीवर पोहोचले आहे, असेही ते म्हणाले.

जलील आज, शनिवारी जाहीर सभेसाठी येथे आले असता विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. मला अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आवाहन देणाऱ्या खासदार राणा यांना अमरावती मतदार संघ हा आरक्षित आहे, याची साधी कल्पना नसावी, याचे आश्चर्य वाटते. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने भरभरून दिले. मात्र या सर्वांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स भाजपने तयार करून ठेवल्या आहेत. एक तर भाजपमध्ये या किंवा कारागृहात जा, हे दोन पर्याय या नेत्यांसमोर ठेवण्यात आले. या नेत्यांनी कारागृहाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी भाजपचा मार्ग स्वीकारला. भ्रष्टाचाऱ्यांना सध्या कारागृहात नाही तर भाजपत स्थान आहे, असेही जलील म्हणाले. भाजपची ‘बी टीम’ आम्ही की राष्ट्रवादी, काँग्रेसची ही नेतेमंडळी आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात चाललयं काय? आणखी एका हत्याकांडाने उपराजधानी हादरली

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आमच्यावर ‘बी टीम’ म्हणून थेट आरोप करायचे, आता तेच भाजपची ‘बी टीम’ झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीसोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत राज्याच्या राजकारणात बरेच काही घडणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही त्यांनी सांगितले.