आज, बुधवारी होणाऱ्या विजयादशमी उत्सवासाठी रेशीमबाग मैदान सज्ज झाले आहे. शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या संघाच्या इतिहासात प्रथमच विजयादशमी उत्सवाला प्रमुख अतिथी प्रसिद्ध गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव उपस्थित राहणार आहेत. शिवाय सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत आपल्या प्रबोधनात काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व असून या कार्यक्रमातून सरसंघचालक आपल्या भाषणातून संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतात, दिशा दाखवतात. यासोबतच संघाच्या भावी योजनांचे संकेत देखील यातून मिळतात. या कार्यक्रमाला देश विदेशातील मान्यवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रेशीमबाग परिसरात कार्यक्रमस्थळी निमंत्रित करण्यात आलेल्या विशेष व्यक्तींसाठी आणि नागरिकांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी पथसंचलनानंतर स्वयंसेवकांच्या कवायती होतील आणि त्यानंतर प्रमुख अतिथी पद्मश्री संतोष यादव आणि सरसंघचालकांचे भाषण होणार आहे.

रेशीमबाग मैदानातून स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या मार्गावरुन एकाचवेळी दोन पथसंचलन निघणार असून पहिले पथसंचलन रेशीमबाग, क्रीडा चौक, अपोली फार्मसी, बॅटरी हाऊस, उमेरड मार्ग रेशीमबाग मैदानावर तर दुसरे पथसंचलन हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक २ मधून बाहेर निघून पुष्पांजली – देवांजली अपार्टमेंट, गजानन चौक, आराध्य ज्वेलर्स, मयूर मंगल कार्यालय, गणेशनगर मैदान, सुरेश भट सभागृहासमोरुन रेशीमबाग मैदानावर पोहचणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat dussehra vijayadashami function in nagpur scsg