नागपूर : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी खजुराहोमधील विष्णु मूर्तीबाबत सुनावणीदरम्यान केलेल्या विधानामुळे देशभर वादंग उठले होते. सोशल मीडियावर सरन्यायाधीश गवई यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.

एका वकीलाने भर न्यायालयात सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या काही दिवसांनंतर सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठाने धार्मिक परंपरांवर भाष्य केले. दिल्ली आणि सभोवतालील परिसरात फटाके फोडण्यावर बंदी घालण्याबाबत सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश गवईंनी यावर विधान केले.

काय म्हणाले सरन्यायाधीश गवई?

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) दिवाळीसाठी हिरव्या फटाक्यांच्या मर्यादित वापरास परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, फटाक्यांच्या उत्पादन आणि वापरासंबंधी प्रश्नांचा विचार करताना व्यावसायिक हितसंबंध आणि सणोत्सवाचा आनंद यापेक्षा जनतेच्या आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण अधिक महत्त्वाचे आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की फटाके फोडणे हे भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत खोलवर रुजलेले आहे आणि सण, उत्सव तसेच शुभ प्रसंगी आनंद व्यक्त करण्याचे साधन मानले जाते. मात्र न्यायालयाने इशारा दिला की अशा परंपरा सार्वजनिक आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या किंवा पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या प्रथांना न्याय्य ठरवू शकत नाहीत.

“जेव्हा प्रश्न पर्यावरण आणि आरोग्याचा असतो, तेव्हा व्यावसायिक हितसंबंध आणि सणाचा उत्साह हे दुय्यम ठरले पाहिजेत,” असे निरीक्षण सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने नोंदविले.

एनसीआरमधील फटाक्यांवरील सर्वसाधारण बंदी उठवत न्यायालयाने हिरव्या फटाक्यांच्या विक्रीला १८ ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान परवानगी दिली आहे. त्यांचा वापर १९ आणि २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत करता येईल. “फटाके फोडणे ही सणासुदीच्या आनंदाची अभिव्यक्ती आहे आणि धार्मिक तसेच इतर शुभ प्रसंगी वातावरणात उत्साह निर्माण करते, ही भारताच्या सांस्कृतिक परंपरेत अंतर्भूत गोष्ट आहे.

मात्र केवळ परंपरा आणि धार्मिक-सांस्कृतिक कारणास्तव फटाक्यांचा अनियंत्रित वापर करून आरोग्याला तात्पुरते किंवा दीर्घकालीन नुकसान पोहोचवणे योग्य नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने हेही सांगितले की त्यांना फटाका उद्योगातील कामगारांचे हक्क आणि जनतेच्या आरोग्याचा हक्क विशेषतः वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांचे संरक्षण यांच्यात संतुलन राखावे लागले.

“समस्या ही फटाक्यांच्या अतिरेक वापरामुळे आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीच्या अभावामुळे निर्माण होते,” असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवत संयमित आणि जबाबदार पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन केले.