नागपूर : मोसमी पावसाने विदर्भात दमदार पुनरागमन केले असून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह १५० गावांचा संपर्क तुटला. १६ अंतर्गत मार्ग बंद झाले. चंद्रपूर जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्या तसेच दुकान, शाळा, कार्यालयांमध्ये पाणी शिरले. धानोरा तालुक्यात पवनी गावातील संजय उसेंडी (२८) या तरुणाचा शेतात काम करत असताना वीज पडून मृत्यू झाला.
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली व मुलचेरा तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आरमोरी, गडचिरोली, मुलचेरा, धानोरा, चामोर्शी, अहेरी, आलापल्ली, भामरागड परिसरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळे अहेरी ते मुलचेरा मार्ग, खुदरामपल्ली आणि कोपरअल्ली मार्ग, एटापल्ली नाक्यासमोरील मार्ग, बोलेपल्ली मार्ग, पाविमुरंडाजवळतील नाल्यावरील मार्ग, चामोर्शी ते माक्केपाली मार्ग, पोटेगावसमोरील मार्ग, आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. चंद्रपूर शहरात मंगळवार सकाळी पावसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून खोल भागातील वस्त्या व शेकडो घरे पाण्याखाली गेली.
गांधी चौक ते जटपुरा गेट हे शहरातील प्रमुख मार्ग दुथडी भरून वाहत होते. वनखात्याचे कार्यालय तसेच शाळा, मंदिर पाण्याखाली गेले. शहरातील मुख्य बाजारपेठेतही पाणी होते. अकोला जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, रिसोड, वाशीम व इतर शहरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यवतमाळात संततधार तर भंडाऱ्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. वर्धा जिल्ह्यातील आष्टी, देवळी, समुद्रपूर येथेही मुसळधार पाऊस झाला. उपराजधानीतही दुपारी चार वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता.
चंद्रपूरमध्ये दिवसभरात २४० मिमी पावसाची नोंद झाली. वर्ध्यात ३१, गडचिरोलीत १४, आणि नागपुरात १२ मिमी पाऊस झाला. मराठवाडय़ात उस्मानाबादमध्ये १६ तर उदगीरमध्ये (लातूर) १४ मिमीची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात फारसा पाऊस झाला नाही. महाबळेश्वरात ७९ तर कोल्हापुरात ४, सांगली, सातारा ३ आणि सोलापुरात ९ मिमी पाऊस झाला आहे. कोकण किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस सुरू होता. अलिबागमध्ये १०, डहाणूत २७, कुलाब्यात २५, सांताक्रुजमध्ये १६ आणि रत्नागिरीत १४ मिमी पाऊस पडला आहे.
पुणे, साताऱ्याला अतिवृष्टीचा इशारा
पुणे : हवामान विभागाने पुणे, सातारा, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला आज, बुधवारी ‘रेड अलर्ट’ दिला आहे. या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून तेथे बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.