अमरावती : शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांची समस्या, दिव्यांगांचे हक्क आणि विविध शोषित घटकांवरील अन्यायाविरोधात ‘आरपारचा लढा’ उभारण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘महाएल्गार’ आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातील शेतकरी, मजूर, दिव्यांग आणि वंचित घटक मोठ्या संख्येने या एल्गार आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपूरकडे कूच करत आहेत. शिदोरी म्हणून विदर्भातील अनेक भागांतून चिवडा तयार करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या महाएल्गार आंदोलनाची तयारी जोरात सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
राज्यभरातून शिदोरीची तयारी
विदर्भातील अनेक गावांमध्ये चिवडा तयार करण्यात येत असून तो शिदोरी म्हणून वापरला जाणार आहे. मौदा परिसरातून ताजे भाजीपाला, गोंदिया, भंडारा, लाखनी भागातून मोठ्या प्रमाणात तांदूळ, नाशिक येथून कांदा आणि इतर भाजीपाला नागपूरकडे पाठवण्यात येत आहे. सोलापूर येथून तब्बल २०,००० भाकरी आणि खास सोलापुरी खर्डा तयार करून आंदोलकांसाठी आणला जात आहे. गावोगावी ट्रॅक्टर दुरुस्त करून ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी सज्ज करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील महिलांनी उत्साहाने तयारी केली असून, अनेक ठिकाणी स्वयंसेवक मंडळे भोजन आणि निवासाची व्यवस्था सांभाळत आहेत. शेतकरी कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव, बेरोजगारांना रोजगार, दिव्यांगांसाठी न्याय्य हक्क, तसेच मेंढपाळ, मच्छीमार आणि लघु शेतकऱ्यांच्या समस्यांवर या महाएल्गार सभेत ठोस निर्णय घेऊन सरकारसमोर मागण्या मांडल्या जाणार आहेत.
मेंढपाळ बांधवांचा सहभाग लक्षणीय
या आंदोलनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील मेंढपाळ बांधव आपल्या संपूर्ण कुटुंबासह, शेळ्या-मेंढ्या आणि बैलगाड्या घेऊन मागील दोन दिवसांपासून नागपूरकडे निघाले आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था आखण्यात आली असून, ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली आहे. राज्यातील विविध संघटनांनी या सभेला पाठिंबा जाहीर केला असून, अनेक शेतकरी संघटनांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सभेला येताना डाळ, तांदूळ, भाकरीचे पीठ, धान्य ईत्यादी जीवनावश्यक वस्तू सोबत आणाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूरच्या भूमीतून उठणारा हा ‘महाएल्गार’चा आवाज राज्याच्या राजकारणात नवा बदल घडवून शोषित घटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देईल, असा विश्वास प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
