वर्धा : एखाद्या उमेदवाराचा पराभव झाला की पुढे काय, असा प्रश्न त्याच्यापेक्षा समर्थक मंडळीस पडतो. मग चर्चा, अफवा, शंका सुरू होतात. आता देवळीत याचीच चर्चा सुरू झाली आहे. पाच वेळा आमदार राहलेले काँग्रेसचे रणजित कांबळे यावेळी भाजपने नेट लावल्याने पराभूत झाले. कांबळे पराभूत होऊच शकत नाही, असे मिथक खोटे ठरविले. प्रचारात भाजपने एक नारा जोरात दिला होता. तो म्हणजे, ‘हैद्राबादचे पार्सल परत पाठवा’. कांबळे पराभूत झाल्याने ते आपल्या मूळगावी हैद्राबादला खरंच परत जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळचे हैद्राबाद येथील असलेले कांबळे हे काँग्रेस नेत्या दिवंगत प्रभा राव यांचे भाचे. त्यांची आई व प्रभाताई या सख्या भगिनी. कांबळे हे तेव्हा नुकतेच अमेरिकेतून व्यवस्थापन पदवी घेऊन भारतात परतले होते. राव कन्या चारूलता टोकस यांच्यावर जिल्हा परिषदेत अविश्वास वादळ सुरू झाले होते. तेव्हा ताईंनी भाचा रणजित यांना देवळीत बोलावून घेतले. त्यांना आईकडून मिळालेली रोहणी येथील शेती सुपूर्द केली. कांबळे हे रोहनीचे पुढे सरपंच झाले. नंतर १९९९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या. लोकसभेत प्रभाताई स्वतः पण देवळी विधानसभा कोणास सोपवायची, हा प्रश्न. कन्या चारूलता यांना लढविणे योग्य दिसणार नाही, असा विचार त्यांनी केला. म्हणून मग सरपंच कांबळे विधानसभा लढले. आमदार झाले आणि मग मागे वळून पाहिलेच नाही. आमदार, महामंडळ अध्यक्ष, मंत्रिपद अशी सत्तेची पदे त्यांना मावशी कृपेने प्राप्त होत गेली. ते इथेच रमले. मात्र त्यांची आई, पत्नी, मुली हैद्राबाद येथेच रमल्यात. देवळीत अपवादत्मक ते येत. पण कांबळे मात्र पूर्ण देवळीकर झाले. कांबळे हे परिवार सोडून एकटेच ईथे राहतात म्हणून ते देवळी सोडून केव्हाही हैद्राबादला परत जाऊ शकतात, अश्या वावड्या नेहमी उठत. पराभव झाल्याने त्या जोरात सुरू झाल्या आहेत. भाजप नेत्यांनी प्रचारात हाच मुद्दा लावून धरला होता. आता खरंच तसे होणार काय, या प्रश्नावर कांबळे यांचे विश्वासू व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर म्हणतात की या अफवाच समजाव्या. रंजितदादा इथेच राहणार. कुठेही जाणार नाही. पक्ष बांधणी करतील. ते पक्के काँग्रेसी असल्याने काँग्रेस पण सोडणार नाही. हैद्राबादला जाणार हे खोटे. एका पराभवाने ते खचणारे नाहीत, असा खुलासा चांदुरकर करतात.

हेही वाचा – VIDEO : वाघाच्या बछड्यांनीही घेतला कोवळ्या उन्हाचा आनंद

हेही वाचा – नागपूर: मंगळवार ठरला घातवार, तीन अपघातात चार ठार

रणजित कांबळे हे इथेच थांबावे लागल्याबद्दल कधी कधी खंत व्यक्त करतात, असे त्यांचे जवळचे काही सहकारी सांगतात. भाऊ तरुण मोठ्या कंपन्या चालवीतो. पत्नी उच्च न्यायालयात हैद्राबादला कार्यरत. मुली अमेरिकेत. आई पण तिकडेच. मीच ईथे अडकलो. खेड्यात जीवन घालवीत. मलाही चांगले विना कटकटीचे जीवन जगता आले असते. पण आता राजकीय क्षेत्र स्वीकारले तर सगळ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, अशी त्यांची भावना असल्याचे सहकारी सांगतात. जिल्हाधिकारी निवास परिसरात असणाऱ्या प्रासादतुल्य निवासात कांबळे व त्यांचा लॅपटॉप हेच निवासी असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचे कार्यकर्ते सांगतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha district assembly election results ranjit kamble deoli defeat hyderabad hometown pmd 64 ssb